नागपूर : आरोग्य खात्यातील दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील डॉक्टरांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली नसून या डॉक्टरांची २३ वर्षांपासूनची पदोन्नती अडकल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. या वृत्ताची दखल घेत आरोग्य खात्याने अखेर ज्येष्ठतासूची प्रसिद्ध केल्याने या डॉक्टरांच्या पदोन्नतीची आशा पल्लवित झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाने बीएएमएस शैक्षणिक अर्हता असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ मधील वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील १ हजार ३२ डॉक्टरांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. यादीत डॉक्टर रूजू झालेल्या संबंधित डॉक्टरांचा नियुक्तीचा मार्ग, संवर्ग, नियुक्तीची तारीख आणि इतरही सगळ्या गोष्टी नमूद आहे. यादीत समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना आक्षेप घेण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली गेली आहे.

हेही वाचा – हॉटेल दरवाढीवर आमदारांची नाराजी; जादा पैसे आकारत असल्याची विधानसभेत तक्रार

डॉक्टरांना एक महिन्याच्या आत हे आक्षेप आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई यांना सादर करायचे आहे. त्यानंतर आरोग्य खात्याकडून पदोन्नतीबाबतही प्रक्रिया होण्याचे संकेत आहे. त्यामुळे २३ वर्षांनंतर या डॉक्टरांना पदोन्नती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे सेवा दिल्यावरही पदोन्नती नसल्याने या डॉक्टरांमध्ये रोष असल्याने ते आंदोलनाच्या तयारीत होते.

हेही वाचा – आरक्षणासाठी धमक्या किती सहन करणार?- छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; विधिमंडळात चर्चा

मागास भागात वर्षानुवर्षे सेवा दिल्यावरही पदोन्नती नसल्याने डॉक्टर संतप्त होते. ‘लोकसत्ता’ने हा प्रश्न मांडल्यावर आरोग्य खात्याने ज्येष्ठतासूची प्रसिद्ध केली. आवश्यक प्रक्रिया करून शासनाने वेळीच पदोन्नती न केल्यास संघटनेला नाईलाजाने हक्कासाठी आंदोलन करावे लागेल. – डॉ. अरुण कोळी, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seniority list of doctors serving in remote areas is published mnb 82 ssb
Show comments