अकोला : लोकसभेच्या रिंगणात भाजपने ‘सेल्फ’ गोल केला. भाजपला मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली. सांगलीचे विशाल पाटील वंचितच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोल्यात बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ‘लुंगी हटाव, पुंगी बजाव’, त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिल्यामुळे मुंबईत राहणारे बिहार, उत्तर व दक्षिणेतील ज्यांना भाजप जवळची वाटत होती, त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा – रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…
मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील आणि ते झाले की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते. त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करु, असे त्यांनी सांगितले.
सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.