लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात अधिवेशन काळ, मोर्चा, सामाजिक आंदोलन किंवा राजकीय आंदोलनादरम्यान कितीही पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांचे नियोजन असल्यानंतरही शहरात हमखास वाहतूक कोंडी निर्माण होते. नाकी नऊ येणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले असून त्यावर अद्यापही तोडगा न निघणे हे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांचे अपयश असल्याचे दिसते.

शहरात सार्वजनिक सुटी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी-दसरा यासह दुर्गोत्सव, नवरात्रोत्सव, गणपती विसर्जन, रॅली आणि मिरवणुकांमध्ये शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र असते. वाहतूक पोलिसांकडे योग्य नियोजन नसल्यामुळे शहराला वाहतूक कोंडीचा शाप लागलेला आहे. नोकरीवर जाताना किंवा कामावर पोहचण्याच्या गडबडीत असलेला नोकर-मजूर वर्ग वाहनाने निघत असतानाच अचानक रस्त्यावर राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटनांचे आंदोलन किंवा मिरवणुका असल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. सामान्य नागरिकांसाठी अशा संकटकालीन परिस्थितीला वाहतूक पोलीस जबाबदार असतात. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी लागणारा अभ्यास आणि अनुभव नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी हे नित्याचेच झाले आहे.

आणखी वाचा-ताडोबा ऑनलाईन बुकिंग घोटाळ्यातील आरोपी ठाकूर बंधूना सर्वोच्च न्यायालयाचाही दणका, अटकपूर्व जामिन फेटाळला…

शहरात वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून गर्दीच्य़ा ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. अरुंद रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर आम्ही तोडगा काढत आहोत. -जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

‘रस्ते अचानक बंद करू नका’

कोणत्याही प्रकारचा उत्सव असला की रस्त्यावर कार्यकर्ते किंवा समाजसेवकाच्या नावावर युवकांची टोळी उतरते आणि सर्वप्रथम रस्ता बंद करून वाहतूक थांबवले जाते. वाहतूक पोलीस किंवा पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. कायद्याचे पालन मिरवणुका किंवा राजकीय पक्षाच्या रॅली-आंदोलनादरम्यान होत नाही. राजकीय नेते वाहतूक नियम नेहमी पायदळी तुडवतात. परिणामतः शहरात विविध ठिकाणी किंवा अनेक चौकात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचा सर्वाधिक त्रास होतो तो फक्त सामान्य नागरिकांना. त्यामुळे कोणत्याही उत्सवादरम्यान अचानक रस्ते का बंद केले जातात, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious problem of traffic jam in home minister devendra fadnavis nagpur city adk 83 mrj
Show comments