बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यासाठी बुधवार (दि. ९) अक्षरशः घातवार ठरला. संध्याकाळी उशिरा झालेल्या विविध दुर्घटनात ७ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री काही भागात विजा आणि वादळी वाऱ्यांचे थैमान देखील पाहवयास मिळाले. यामुळे बुलढाणा जिल्हा हादरला. बुधवारी झालेल्या दोन स्वतंत्र घटनांत वीज कोसळून दोन शेतकरी ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले.चिखली नजीकच्या संभाजीनगर परिसरात ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पहिली भीषण दुर्घटना घडली. अमोल देविदास जाधव (वय४२ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेत त्यांची पत्नी शीतल जाधव ( वय ३५वर्षे) आणि किशोर माधव देशमाने ( वय ५९ वर्षे) गंभीर जखमी झाले. चिखली नजीकच्या जुना भानखेड मार्गावर जाधव परिवाराचे शेत आहे.बुधवारी शेतात सोयाबीन} ची सोंगणी करण्यासाठी हे तिघे गेले होते. यावेळी पाऊस सुरू झाल्याने हे तिघे पळसाच्या झाडाखाली उभे राहिले. यावेळी नेमकी त्याच झाडावर वीज कोसळून ही दुर्घटना घडली. दुसऱ्या घटनेत मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.अरुण श्यामराव खरात (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील इरला येथे गोठ्यावर वीज पडून गायीचा मृत्यू झाला.

हे ही वाचा…उद्योग उभारणीतील टाटा समुहाचे नागपूर कनेक्शन : नागपूरची एम्प्रेस मिल

मासरूळ मंडळाला वादळाचा फटका

दरम्यान बुधवारी रात्रीच तुफानी वादळाने बुलढाणा तालुक्यातील मासरूळ परिसराला तडाखा दिला. यामुळे मासरूळ, गुम्मी, तराडखेड या गावात आणि मार्गावरील मोठाली झाडे उन्मळून पडली. यामुळे आज सकाळ पर्यंत वाहतूक प्रभावित झाली.तसेच शेतातील खरीप पिकांची नासाडी झाली. निवृत्त लष्करी जवान एस. व्ही. भगत यांच्या शेतातील कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे.

पोहण्यास जाणे बालकांच्या जीवावर बेतले

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ९ ऑक्टोबरला शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील बोर्डी नदीत ही घटना घडली. कृष्णा राजू फुटवाईक(१४ रा. बेलूरा) आणि शुभम गजानन पुरी(१४, रा. माटरगाव) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. दोघे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. याप्रकरणी जलंब पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी पुलावरुन नदीत पडल्याने एक शेतमजुर दगावला. त्र्यंबक रामभाऊ शिरस्कार (६५) असे मृताचे नाव आहे.

हे ही वाचा…गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यत सर्वांची धावाधाव,’ पेट्यां’मध्ये दडलंय काय?

अपघातात २ ठार, तीन जखमी

खामगाव शेगाव मार्गावरील लासुरा फाटा नजीक बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चालकासह दोन इसम ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले. प्रवाश्यांना घेऊन ऑटो शेगाव येथून खामगाव कडे जात होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. यामुळे ऑटोचालक चंद्रकांत तुळशीराम पाचपोर (खामगाव) आणि शालिग्राम रामराव पारस्कर (६५) यांचा मृत्यू झाला. तसेच विजय आघाव ,नर्मदा रामचंद्र धनोकार (६०) वैशाली अजय तायडे (वय २१) हे गंभीर जखमी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven people died and five seriously injured in accidents on wednesday evening in buldhana district scm 61 sud 02