नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने दोघांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, तिघेजण वाहून गेले. बुलढाणा आणि अकोला जिल्हयातही प्रत्येकी एकाने जीव गमावला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाघाडी वस्ती शनिवारी पहाटे पाण्याखाली गेली. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच मार्गावर पुराचे पाणी असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आले. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, धामणगाव रेल्वे तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे या गावातील एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
मोर्शी तालुक्यात माळू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगव बंड येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात केदार नदीला पूर आला आहे. त्यामुळे बावनबीर, टूनकी गावांचा संपर्क तुटला आहे. अकोला जिल्ह्यात विद्रुपा नदीला पूर आला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. हिवरखेड-अकोट मार्गावरील नाल्याच्या पुलावरून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. वाशीम जिल्ह्यातही शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.