नागपूर : पूर्व विदर्भात आता हिवताप डोके वर काढत आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ दरम्यान येथे या आजाराचे तब्बल ७ बळी गेले आहे. त्यापैकी पाच मृत्यू हे गेल्या दीड महिन्यातील असल्याची नोंद पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग कार्यालयात झाली आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत १ जानेवारीपासून ३१ जुलै २०२३ दरम्यान हिवतापाचे २ हजार ८५९ रुग्ण आढळले. त्यापैकी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक २ हजार ६५६ रुग्ण हे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आढळले. तर भंडारा जिल्ह्यात २, गोंदियात ९८, चंद्रपूरला ९८, नागपूर ग्रामीणला ४, नागपूर शहरात १ रुग्णाची नोंद आहे.
हेही वाचा – मंजुरी २४ वर्षांपूर्वी, प्रत्यक्ष काम आता सुरू; नागपूरच्या रस्त्यांची कहानी
हेही वाचा – अंदाज ठरला खोटा, पाऊस आला मोठा! राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार
वर्धा जिल्ह्यात एकही हिवतापाच्या रुग्णाची नोंद नसल्याने येथील आरोग्य विभागाच्या नोंदीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्व विदर्भात एवढे रुग्ण व मृत्यू झाल्याच्या वृत्ताला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातूनही दुजोरा देण्यात आला आहे.