नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये गुरूवारी रात्री गणपती विसर्जनादरम्यान फटाक्यांमुळे सात महिला भाजल्या आहे. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहे.

उमरेडमध्ये शिवस्नेह गणेश मंडळाद्वारे आयोजित केला जाणारा गणेशोत्सव उमरेडचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवादरम्यान येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी येथील गणपती विसर्जनाची मिरवणूकही आकर्षणाचे केंद्र आहे. गुरूवारी रात्री (१९ सप्टेंबरला) मंडळाकडून गणेश विसर्जनाची मिसवणूक निघाली. त्यात मोठ्या संख्येने परिसरातील भाविक सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> नागपूर: तरुणीने अनेकांच्या नावावर घेतले कोट्यवधीचे कर्ज

मंडळाकडून गणेश विसर्जनादरम्यान ढोल- ताशेसह फटाक्यांचेही प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विसर्जनाच्या मिरवणूकीत परिसरातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन नाचत होते. मिरवणूकीत मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी फटाका प्रदर्शनासाठी फटाके पेटवले. त्यानंतर अचानक फटाक्याच्या स्फोट होऊन येथील सुमारे सात महिला आगित जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तर आगीत महिला भाजत असल्याचे बघत उपस्थितांची पळापळ झाल्याने काही जण खाली पडले.

उपस्थितांनी तातडीने जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. येथे प्राथमिक उपचारानंतर काहींना नागपुरातील खासगी रुग्णालयात हलवले गेले. सध्या सगळ्याच जखमी महिलांची प्रकृती स्थिर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत फटाका प्रदर्शनासाठी कोणतेही सुरक्षेचे उपाय केले नसल्याचे पुढे येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचे गांभिर्य बघत गणेशोत्सव मंडळाच्या फटाके फोडणाऱ्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेनंतर काही संतप्त नागरिकांनी उमरेड पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने तणाव निर्माण झाल्याचीही माहिती काही उपस्थितांनी दिली.

हेही वाचा >>> खुशखबर… विजेचे दर घटणार! राज्यात युनिटमागे एवढ्या रुपयांची…

पोलिसांचे म्हणणे काय? सिवस्नेह गणेश मंडळाकडून गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाल्यावर ती उमरेडच्या श्रीकृष्ण मंदिर, ईतवारी येथे रात्री ९ ते ९.३० वाजता पोहचली. येथे भाविकांची गर्दी होती. दरम्यान मंडळातील कार्यकर्त्याने फटका प्रदर्शनासाठी फटाके काढले. एकाने फटाक्याची वाती पेटवली. त्यानंतर अचानक फटाक्याचा जोरदार स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा काही महिलांच्या अंगावर उडाल्या. त्यामुळे सुमारे सात महिला आगीत किरकोळ भाजल्या गेल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले गेले. पोलिसांकडून जखमी महिलांना विचारणा केली असता कुणीही तक्रार द्यायला तयार नव्हते. परंतु मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले कृत्य बेकायदेशीर असल्याने गणेशोत्सव मंडळातील फटाका फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उमरेड पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.