वर्धा : सोशल मीडियावरील पोस्ट पाहून गुन्हा करणारे व गुन्हा करीत तो सोशल मीडियावार टाकणारे, असे दोन वर्ग झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळते. ही घटना यापैकीच. हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव माथणकर या गावात पोस्टमुळे रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे. यात हिंगणघाट येथील कबीर वॉर्डात राहणाऱ्या हिमांशू किशोर चिमणे या सतरा वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला. तर मानव धनराज जुमनाके,२१ व अनिकेत धनराज जुमनाके, २३ या दोघांना अटक झाली.
गत दीड महिन्यापासून या तिघांत वाद सूरू होता. इंस्टाग्रामवार ‘ बाप तो बाप रहेगा ‘ अशी पोस्ट टाकण्यात आली होती. आरोपी बंधुनी त्यावरून वाद सूरू केला. दोघेही हिमांशू याच्या घरी जाऊन भांडण करून आले होते. मात्र हा वाद अधिक वाढू नये म्हणून हिमांशू हा त्याच्या दोन मित्रांसोबत पिंपळगाव येथे समझोता करण्यास गेला होता. तेव्हा पण त्यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली. तेव्हाच हिमांशू याने मानव यांस चापट मारली. तेव्हा हिमांशूने त्याच्या जवळ असलेले धारधार शस्त्र काढून मानववर हल्ला चढवीला. प्रत्युत्तर म्हणून मानव व अनिकेत या दोघांनी हिमांशूच्या मानेवर, छातीवर चाकूने सपासप वार केले. त्यात खूप रक्तस्त्राव झालेला हिमांशू गतप्राण झाला. या झटपटीत हिमांशू याने चाकूने केलेला वार अडविण्यासाठी मधात पडलेल्या अनिकेतच्या हाताला पण गंभीर जखम झाली आहे. प्राथमिक उपचार करीत त्यास वर्धेच्या रुग्णालयात पाठविण्यात आले.
या प्रकरणी मानव जुमनाके यांस अटक करण्यात आली असून अनिकेत पोलिसांच्या ताब्यात आहे. रविवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मृत हिमांशू याच्या आईने पोलीस तक्रार केली. त्यावरून अनिकेत व मानव विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मानव जुमनाके याने पण तक्रार केल्याने हिमांशू, ओम क्षीरसागर व प्रतीक पंचभाई रा. हिंगणघाट यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. एका लहान गावात सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टने असा गंभीर वाद व त्यातून झालेला खून चांगलाच चर्चेत असून चर्चेस पेव फुटले आहे. विशी बावीशीतील मुलांचे हे काय वेड, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.