नागपूर : युनिसेक्स सलूनच्या नावावर देहव्यापार करणाऱ्या दोन आरोपींनी एका विवाहित महिलेला सेक्स रॅकेटमध्ये ढकलले. तिच्याकडून देहव्यापार करवून घेतला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे धाड मारून पीडित महिलेची सुटका केली, तर आरोपींना ताब्यात घेऊन लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले. नितीन पवार (२६) रा. संजय गांधीनगर, नीलम ऊर्फ निशा बनोदे (३५) अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >>> वर्धा : हिरकणी कक्ष घेत आहेत लक्ष वेधून!
नितीन पवार हा संगणक दुरुस्ती करायचा. कंपन्यांनी संगणक दुरुस्तीचे काम नितीन ऐवजी अभियंत्याना देणे सुरू केले. बेरोजगार झालेल्या नितीनने सलूनच्या कामाचे प्रशिक्षण घेतले. तेथे काही तरुणी देहव्यापार करीत होत्या. आंबटशौकीन ग्राहक ५ ते १० हजार रुपये सलूनच्या संचालकांना देत होते. त्यानेही सलूनच्या आड देहव्यापार सुरु करण्याचा विचार केला. नितीनने लकडगंज परिसरात भाड्याची खोली घेतली. ‘गबरू युनिसेक्स सलून’ या नावाने दुकान थाटले. नीलम बनोदे या मैत्रिणीला भागिदार केले. निलमने ३० वर्षीय पीडित विवाहित महिलेला देहव्यापार करण्यासाठी विचारणा केली. तिला पती आणि दोन मुले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि वाढता घर खर्च पूर्ण करणे कठीण जात होते. नीलमने पीडित महिलेला देहव्यवसाय करण्यासाठी तयार केले.
हेही वाचा >>> गडचिरोली : रानटी हत्तीने शेतकऱ्याला पायाखाली चिरडले…
या प्रकरणाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांना मिळाली. सापळा रचून धाड मारण्याची योजना आखण्यात आली. एका बनावट ग्राहकाला दुकानात पाठविण्यात आले. सौदा पक्का होताच ग्राहकाने इशारा केला आणि दबा धरून बसलेल्या पथकाने धाड मारली. आरोपींना ताब्यात घेऊन पीडित महिलेची सुटका करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.