लोकसत्ता टीम
नागपूर : अंबाझरीतील टिळकनगरात असलेल्या ड्रीम फॅमिली स्पा-मसाज सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘सेक्स रॅकेट’ सुरु होते. या मसाज सेंटरमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसाठी विवाहित महिला आणि महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. गुन्हे शाखेने या सलूनवर छापा घालून तीन तरुणींची सुटका केली. सलूनच्या दोन्ही मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. निर्भय चंद्रमणी बलबिर (२०) याला पोलिसांनी अटक केली तर मालक यश किशोर कटरे (२२) आणि रवी शाहू (३५) हे दोघे फरार झाले आहेत.
टिळकनगरातील ड्रीम फॅमिली स्पा-मसाज सेंटरमध्ये पुरुष ग्राहकांची अचानक गर्दी वाढायला लागली. विवाहित महिलांसह तरुणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना दिसत होत्या. अंबाझरी पोलिसांचे या प्रकाराकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्यामुळे कारवाई होत नव्हती. शेवटी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कविता ईसारकर यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. बनावट ग्राहकाने देहव्यापारासाठी तरुणीची मागणी केल्यानंतर सलूनचा व्यवस्थापक निर्भय बलबीर याने १८ ते २१ वर्ष वयोगटातील तीन तरुणींना हजर केले. त्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना सूचना दिली.
आणखी वाचा- वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण बंद करण्याचा घाट!
पोलिसांनी सापळा रचून छापा घातला. तीनही तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी एक महिला विवाहित असून तिला ३ वर्षांचा मुलगा आहे. पतीचा तुटपुंजा पगार असल्यामुळे ती स्पा-मसाज सेंटरमध्ये काम करीत होती. मात्र, मालक यश कटरे आणि रवी शाहू यांनी तिला आंबटशौकीन ग्राहकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडित दोन मुली महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून शिक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी देहव्यापारात ढकलल्या गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तरुणींना १० ते १२ हजार रुपये पगार देऊन देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात येत होते.