एका अल्पवयीन मुलीचे युवकाने छत्तीसगडमधून अपहरण करून नागपुरात आणले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती झाली.
पोट दुखत असल्यामुळे मुलीला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांच्या वरील बाब निदर्शनास आली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी योगेश नायडू निषाद (२३) दनिया धमदा, जि. दुर्ग (छत्तीसगड) यास अटक केली.
२ नोव्हेंबर २०२० मध्ये योगेश निषाद याने त्याच्याच गावी राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नागपूरला आणले होते. तिला हिंगणा हद्दीत वागदरा येथे भाड्याच्या खोलीत ठेवण्यात आले. योगेशने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान गावात दोघांची बदनामी झाली. पण मुलगी गावी आईवडिलांच्या भीतीपोटी गावी परत जाण्यास तयार नव्हती.
सोमवारी सकाळी तिच्या पोटात दुखत असल्यामुळे योगेशने तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तेथे ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तिचे अल्पवय पाहता डॉक्टरांनी तत्काळ ही माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून योगेश यास अटक केली.