वडिलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महिलेने एका ५० वर्षीय व्यक्तीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्याची वाईट नजर प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवर पडली. त्याने घरात कुणी नसताना त्या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात राहणारी ३० वर्षीय महिलेच्या पतीचे २०१० मध्ये एका अपघातात निधन झाले. त्यावेळी तिला एक मुलगी होती. तिच्याशी आरोपी शामलाल (५०, भंडारा) याची ओळख झाली. त्या महिलेला पती नसल्याचे हेरून शामलालने तिच्याशी मैत्री केली. तिला अनेकदा आर्थिक मदतही केली. मैत्री वाढत गेल्याने शामलालचे घरी येणे-जाणे वाढले. शामलालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जीवनाला जोडीदार आणि संसाराला आधार म्हणून ती महिलाही त्याच्या प्रेमात पडली. त्याने लग्न न करताच तिला सोबत ठेवण्याचे ठरवले. तसेच मुलीचाही खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे महिलेने त्याच्यासोबत राहण्याची तयारी दर्शवली. काही दिवसांतच तो तिच्या घरी राहायला आला. तो विधवा महिलेच्या घरात राहत असल्यामुळे गावात बदनामी झाली. तसेच महिलेचे नातेवाईकही तिला शामलालबाबत विचारपूस करीत होते. त्यामुळे भंडारा सोडून २०१९ मध्ये ते नागपुरात कामाच्या शोधात आले.
हेही वाचा >>>नागपूरनिर्मित राफेल विमानाच्या सुटय़ा भागांचा फ्रान्सला पुरवठा
कन्हानमधील एका फार्महाऊसवर काळजीवाहक म्हणून शामलाल हा प्रेयसी व तिच्या १५ वर्षीय मुलीला घेऊन आला. काही दिवसातच त्याची वाईट नजर प्रेयसीच्या मुलीवर गेली. त्याने रात्रीच्या सुमारास प्रेयसी झोपल्यानंतर मुलीशी अश्लील चाळे करणे सुरू केले. आईला सांगितल्यास शेतातील विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली. प्रेयसी शेतात गेल्यानंतर शामलालने मुलीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला विहिरीजवळ नेऊन बसवून ठेवले.
हेही वाचा >>>औद्योगिक वीजवापरात मासिक २६८ दशलक्ष युनिटची वाढ
शामलाल हा रोजच दारू पिऊन मुलीला शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत होता. त्यामुळे तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. परंतु, शामलालच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आईने तिला गप्प बसण्यास सांगितले. त्यामुळे शामलालची हिंमत वाढली. तो तिच्यासोबत आईसमोरच लैंगिक अत्याचार करीत होता. तिने आपल्या एका नातेवाईकाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन गुन्हा दाखल करून तपासासाठी कन्हान पोलिसांकडे वर्ग केला.