अमरावती : चुलतभावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी पीडित १५ वर्षीय मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. यावेळी चुलत भावाने तू माझी बहीण आहेस, हे मला माहित आहे. पण, तरीही तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे तिला म्हटले. मात्र, तिने नकार दिला. परंतु, त्याच क्षणापासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइलवर संवाद सुरू झाला. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी त्याने तिला धमकीसुद्धा दिली. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तेथून सलग ८ दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माहित पडल्यास कुटुंबातील सदस्य मारतील, या भीतीने तिने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.
हेही वाचा – नागपूर : भरधाव कार घरात शिरली, झोपलेल्या १० वर्षीय मुलाचा क्षणात…
दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना स्वत:त काही शारीरिक बदल जाणवल्याने तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर ती मैत्रिणीच्या सल्ल्याने तपासणीसाठी एका रुग्णालयात गेली. यावेळी डॉक्टरांनी तिला तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे, तिने याबाबत आपल्या आई व आजीला माहिती दिली. त्यानंतर आईसह पुन्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी केली. त्यावेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. तसेच, त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सूचविण्यात आले. त्यानुसार पीडितेने आईसह कोतवाली ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.