नागपूर : इन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या अमरावतीच्या एका २१ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एका तोतया लष्करी जवानावर गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन कांबळे उर्फ शिवा कदम असे आरोपीचे नाव आहे.

पीडित तरुणी ही नर्सिंगच्या चौथ्या वर्षाला शिकत आहे. आरोपी अर्जुन उर्फ शिवासोबत तिची इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली. त्यानंतर त्यांनी आपआपले मोबाईल क्रमांक एकमेकांना देऊन ते बोलू लागले. त्यावेळी अर्जुन उर्फ शिवाने तिला ‘मी लष्करात सैनिक आहे. सध्या मी जम्मू काश्मिर येथे कार्यरत असून माझे नागपूरला बियर बार आणि दोन, तीन घर आहेत’ असे सांगितले. मुलगा श्रीमंत आहे हे समजून तरुणी त्याला प्रतिसाद देऊ लागली. दरम्यान, त्याने तिला ‘तू माझ्यासाठी काय करू शकतेस?’ अशी विचारणा केली. आरोपीने तिला पैशाची मागणी केली असता तिने त्याला १७ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याने तिला नागपूरला भेटायला बोलविले.

२१ जुलै रोजी तरुणी नागपूरला आली असता तिने अर्जुनसोबत संपर्क केला. त्यावेळी त्याने शिवा कदम नावाचा मित्र तुला घ्यायला येईल असे सांगितले. शिवाने तिला गणेशपेठ बसस्थानक येथून सोबत घेतले आणि सीताबर्डी येथील संस्कृती लॉज येथे आणले. तिने परत अर्जुनसोबत संपर्क केला असता बहिणीचा वाढदिवस असल्याने मी येऊ शकत नसल्याचे सांगितले. शिवाने तिला शितपेयातून गुंगीचे औषध दिले. तरुणी ही गुंगीत असताना रात्रीच्या वेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. सकाळी तिला जाग आली असता घडलेला प्रकार लक्षात आला.

शिवा तरुणीला लॉजच्या खोलीत कोंडून बाहेर जात असे. त्यामुळे तिला बाहेर पडता येत नव्हते. तिने परत अर्जुनसोबत संपर्क केला असून असता करोना झाल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले. तीन दिवस शिवाने तिचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर तिने अर्जुनसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता.

बहिणीला सांगितली हकीकत

सलग तीन दिवस लैंगिक शोषण केल्यानंतर ती घरी परतली. तिच्या बहिणीला घडलेला प्रकार सांगितला. तिच्या बहिणीने फेसबुकवरून शोध घेतला असता अर्जुन आणि शिवा हा एकच युवक असल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी तरुणीने अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनास्थळ नागपूर असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण सीताबर्डी पोलिसांकडे पाठविले.

Story img Loader