यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील एका गावात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची मन सुन्न करणारी घटना घडली. आजोबांच्या वयाच्या व्यक्तीने हा अत्याचार केला. ही घटना ७ डिसेंबरला घडली. घटनेच्या दोन दिवसानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेने ही घटना उजेडात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल शालिक शेंडे (५४) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. घरापुढे बंद अवस्थेत असलेल्या ऑटो रिक्षात ७ डिसेंबरला पीडित चिमुकली खेळत होती. आई-वडील मजुरीला, तर आजोबा शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्याने ती एकटीच घरी होती. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत नराधम अनिलने तिला जवळ घेतले. त्यानंतर तिच्याशी विकृत चाळे केले. तिला वेदना असह्य झाल्याने ती रडायला लागली.

हेही वाचा >>> ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…

तिचे रडणे ऐकून रस्त्यावर बसून असलेल्या महिला ऑटोरिक्षाकडे धावून गेल्या. यावेळी विकृत अनिलने तेथून पळ काढला. दरम्यान, सायंकाळी आई-वडील आणि आजोबा घरी परतले. मात्र, चिमुकलीला आपबिती कथन करता येत नव्हती. मात्र, ती वारंवार रडत असल्याने कुटुंबियांना तिची प्रकृती बरी नसल्याने ती रडत असावी, असे वाटले. दुसऱ्या दिवशी तिची आई शेतात कापूस वेचायला गेली होती. यावेळी शेजारी महिला त्या शेतात पोहोचली. त्यानंतर तिने या घटनेची वाच्यता तिच्याकडे केली. ते ऐकून पीडित चिमुकलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वत:ला सावरत तिने घर गाठले. शिवाय पती आणि सासऱ्याला घरी बोलाविले. मुलीसोबत घडलेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. त्यानंतर ९ डिसेंबरला रात्री त्यांनी पीडित चिमुकलीला घेऊन घाटंजी पोलीस ठाणे गाठले. तसेच याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. शिवाय नराधम अनिल शेंडे याच्याविरुद्ध भा.न्या.सं. ६५(२) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचा >>>गोंदिया : ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपर आणा’; भाकप, ‘बीआरएसपी’ आक्रमक

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश व्यंजने यांनी पीडित चिमुकली व कुटुंबियांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार निलेश सुरडकर करीत आहे.

नराधमाची कारागृहात रवानगी

लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ९ डिसेंबरला रात्री पोलिसांनी शिघ्रगतीने तपासचक्रे फिरवून नराधम शालिक याला राहत्या घरून बेड्या ठोकल्या. दरम्यान मंगळवारी त्याला ठाणेदार निलेश सुरडकर यांच्यासह पोलीस पथकाने यवतमाळ येथील न्यायालयापुढे हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual assault on three year old girl in ghatanji yavatmal crime news nrp 78 amy