नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवून देण्यासाठी आरोपी शाहिद शरीफने राज्यभरात जाळे विणले होते. शरीफने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधींचा आरटीई घोटाळा केला. मात्र, गेल्या महिन्याभरापासून शरीफ हा अचानक बेपत्ता झाला. सदर, सीताबर्डी आणि गिट्टीखदान पोलीस विशेष पथके तयार करून शरीफचा शोध घेत आहेत. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे शाहिद शरीफ गेला कुठे? असा प्रश्न पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहिद शरीफने सुरुवातीला नागपुरातील शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या टोळीत सहभागी करून श्रीमंत आणि गलेलठ्ठ पगार असलेल्या पालकांच्या पाल्यांना आरटीईमधून प्रवेश मिळवून दिला होता. त्याबदल्यात शरीफने लाखो रुपयांची कमाई केली. पहिल्या वर्षी शरीफचा गोरखधंदा नागपुरात चांगल्याप्रकारे चालल्यामुळे त्याने पुण्यातील शिक्षण महासंचालक कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टोळीत सहभागी करून घेतले. आरटीईचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर शरीफ हा मोठ्या अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करून पैसे स्वीकारलेल्या पाल्यांचा आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवून देत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील आरटीई घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार हा शाहिद शरीफ असल्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. शरीफ पोलिसांच्या हाती लागल्यास अनेक अधिकाऱ्यांसह काही राजकीय नेत्यांचीही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – बाप रे… बिहारच्या विद्यार्थ्याची नागपुरात आत्महत्या, खोलीतून कुजलेला वास आल्याने…

हेही वाचा – Video:…अन् ताडोबातील वाघिणीने पाणवठ्याजवळच ठोकला मुक्काम

‘त्या’ पालकाला ४ दिवस कोठडी

सीताबर्डी पोलिसांनी १७ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तक्रारीवरून पोलिसांनी दोन पालकांना अटकही केली. यापूर्वी श्यामशंकर पांडे याला तर मंगळवारी तारेंद्र पवार (चिंचभवन) याला अटक केली. तारेंद्र पवार हा लुपिन फार्मास्युटीकल कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीवर असून त्याने आपल्या मुलाला आरटीईतून प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र तयार केले होते. त्याला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid sharif accused of rte scam in nagpur is not found adk 83 ssb