नागपूर: सध्या राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात सत्तावर्तुळ आणि परिवारातील अनेक शाळा असल्याचे समोर आले आहे. शिक्षण आयुक्तांकडून सध्या तपास सुरू असलेल्या १०५६ नियुक्त शिक्षकांची यादी ‘लोकसत्ता’च्या हाती लागली असून यात सेवासदन प्राथमिक शाळा, केशवनगर प्रा. शाळा, नवयुग प्रा. शाळा, लोकमान्य प्रा. शाळा, मंजूषा काॅन्व्हेंट या शाळांमध्ये २०१९ ते २०२५ या काळात गैरमार्गाने सर्वाधिक ‘शालार्थ आयडी’ तयार करण्यात आल्याचे व त्यांच्या नोंदीच नसल्याचे यादीवरून दिसून येते.

या प्रकरणाचा तपास सदर पोलीस आणि सायबर पोलिसांकडून सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात लोक अटकेत असून गुरुवारी पुन्हा दोघांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यात सागर भगोले आणि शिवदास ढवळे यांचा समावेश आहे.

ढवळे हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत आहे. तर सागर भगोले एका शाळेत कर्मचारी आहे. परंतु, पूर्णवेळ प्राथमिक शिक्षण विभागात वेतन कक्षात मध्यस्थी म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्याच्या काही शाळा असून बारचा मालकही असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.

आतापर्यंत काय कारवाई झाली आहे?

अपात्र शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतमान वंजारी याच्या अध्यक्षततेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली. त्यांनी त्यांचा अहवाल १२ फेब्रुवारी २०२४ ला शिक्षण आयुक्तांना दिला. त्यात वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांनी ५८० शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाला मंजुरी दिली, असा ठपक ठेवण्यात आला होता. त्या आधारावर वाघमारे यांना १० ए प्रिल २०२५ ला निलंबित करण्यात आले. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत बनावट कागदपत्राच्या आधारे पुंडके यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती केल्याची तक्रार नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात मुन्ना वाघमारे यांनी केली होती.

तक्रारीच्या आधारावर सदर पोलिसांनी ११ एप्रिलला नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके यांना अटक केली. त्यानंतर नीलेश मेश्राम, संजय दुधाळकर आणि सूरज नाईक यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर सायबर पोलिसांनीही तपास सुरू केला. त्यांनी महेंद्र म्हैसकर आणि राजू मेश्राम या दोघांना अटक केली.

आतापर्यंत सात लोकांना अटक झाली आहे. या सर्वांची कारागृहात रवानगी केली आहे. सायबर पोलिसांनी शालार्थ आयडी प्रकरणात उल्हास नगरड आणि सूरज नाईक यांना अटक करून त्यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी सागर भगोले आणि शिवदास ढवळे यांना अटक केली आहे. तर माजी विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना सदर पोलिसांनी नोटीस देत चौकशीसाठी बोलावले आहे.