चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पांढरवानी येथील शालू शामराव घरत या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औद्योगिक निरीक्षक परिक्षेत यश संपादन केले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून महिलांमध्ये राज्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावची लेक अधिकारी झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी मुलीसह कुटुंबीयांची गावात ढोल, ताशाचा गजरात मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव केला. महिलांनी औक्षण केलं. गावानं केलेलं भव्य दिव्य स्वागत बघून ती भावनिक झाली.

चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील शालू शामराव घरत हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळेत झाले. तिने यानंतरचे शालेय शिक्षण नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालय येथे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आंनद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पूर्ण करून विज्ञान शाखेच्या पदवीचे शिक्षण नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातून पूर्ण केले. सध्या तिचे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण सुरू आहे. विज्ञान विषयातील पदवी मिळवल्यानंतर अधिकारी बनण्याच्या उद्देशाने नेचर फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण तिने घेतले.

हेही वाचा – आठ वर्षीय तनिष्कने ‘कळसुबाई’ केले सर; राज्यातील सर्वोच्च शिखरावर रोवला बुलढाण्याच्या लौकिकाचा झेंडा

यादरम्यान तिच्या संघर्षाची आणी जिद्दीची दखल ब्राईटएज फाऊंडेशननं घेतली. ब्राईटएज फाऊंडेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्तीसाठी शालूची निवड करण्यात आली. या शिष्यवृत्तीमधून दरमहा आर्थिक मदत तिला मिळत होती. ज्यामुळे तिला पुणे सारख्या शहरात विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून महिलांमध्ये राज्यात प्रथम आल्याने चंद्रपूर जिल्ह्याची मान गौरवाने उंच झाली आहे.

हेही वाचा – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली व मित्रांसह ताडोबात दाखल

गावची लेक अधिकारी झाल्याची बाब गावकऱ्यांना माहिती होताच ढाेल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत स्वागत केले. शालूने आपल्या यशाचे श्रेय गुरूजन, आईवडिलांना दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalu gharat of chandrapur stood first in the state among women from the scheduled tribe category in the industrial inspector examination rsj 74 ssb
Show comments