अमरावती : रस्‍त्‍याच्‍या कडेला सोडून दिलेल्‍या बेवारस, दिव्‍यांग मुलांना पितृछत्र देऊन त्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी आयुष्‍यभर धडपड करणारे ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा वाढदिवस एरवी अत्‍यंत साधेपणाने वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्‍यांग, बेवारस बालगृहात साजरा केला जातो. पण, त्‍यांचा ८४ वा वाढदिवस खास होणार होता. बालगृहातील मुले-मुली आपल्‍या बाबांच्‍या वाढदिवसाच्‍या तयारीत गुंतलेले असताना सकाळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा शंकरबाबांना फोन आला. अमित शहा यांनी त्‍यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. बेवारस, दिव्‍यांग मुला-मुलींच्‍या पुनवर्सनाचा कायदा व्हावा, या मागणीचा पुनरूच्चार शंकरबाबा यांनी चर्चेदरम्यान केला, त्यावर निश्चितपणे हा कायदा केला जाईल, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

आज सकाळी वझ्झर येथील बालगृहात १२३ मुला-मुलींच्या उपस्थितीत शंकरबाबा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बालगृहातील मुला-मुलींनी त्यांचे औक्षण केले. त्यांचे आशीर्वाद घेतले. याआधी गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वीय सहायकांनी शंकरबाबा यांच्याशी फोनवर संपर्क साधला. अमित शहा हे आपल्याशी बोलू इच्छितात असे, त्यांनी सांगितल्यानंतर शंकरबाबा यांच्यासाठी हा सुखद धक्का होता. ८४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच गृहमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली.

देशाच्या गृहमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसाची आठवण ठेवावी आणि संवाद साधावा, हा एक आनंदाचा क्षण असल्याचे शंकरबाबा पापळकर म्हणाले. अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. या ठिकाणच्या १२३ मुला-मुलींच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर यांचे नाव लागते. या सर्व मुला-मुलींचे ते पिता आहेत.

या मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावरील उपचार आणि त्यांचे विवाह लावून देण्याची जबाबदारी देखील शंकरबाबा यांनीच सांभाळली. आजवर ३० मुला-मुलींचे लग्न करून देताना त्यांच्या योग्य पुनर्वसनाचे यशस्वी ‘प्रारूप’ शंकरबाबा यांनी तयार केले आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु अपंग, मतिमंद, दृष्टिहीन मुले व मुली कुठे जाणार, असा सवाल करून या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कायदा करावा, अशी शंकरबाबांची मागणी आहे.

Story img Loader