अमरावती जिल्ह्य़ात सातपुडाच्या पर्वतरांगा जेथे संपतात त्याच्या पायथ्याशी वझ्झर नावाचे छोटेसे गाव आहे. या गावाबाहेर अनेक टेकडय़ांच्या कुशीत एक अवलिया राहतो. शंकर पापळकर त्याचे नाव. १२५ मतिमंद, अंध, अपंग, मूकबधिर मुलांना सरकारी तिजोरीतून एकही छदाम न घेता सांभाळणाऱ्या या बाबाच्या कामाचे कौतुक सर्वाना आहे. त्यांचा संदर्भ एवढय़ाचसाठी की, या फकिराने याच मुलांच्या मदतीने १५ हजार झाडांचे जंगल तयार केले आहे. आता पावसाळा सुरू झाल्यापासून हा बाबा व त्याची ‘ग्रीनआर्मी’ कमालीची व्यस्त झाली आहे. रोज पहाटे हे शेकडो हात नवनव्या प्रजातींची नवनवीन झाडे लावण्यासाठी झटत आहेत. या अपंग मुलांपैकी अनेकांना झाडाचे रोपटे उचलणे कठीण जाते व काहींना तर पाण्याची बादलीही उचलता येत नाही. या मुलांच्या मदतीसाठी बाबांनी दोन साथीदार ठेवले आहेत. प्रसंगी त्यांची मदत न घेता ही मुले दिवसभर वृक्षारोपण करण्यात व्यस्त असतात. सारेच कसे थक्क करणारे आहे.

दरवर्षी पावसाळ्यात वझ्झरच्या या विस्तीर्ण आश्रमात होणारे वृक्षारोपण सरकारी मदतीने होत नाही. हात ना पसरू कधी, असे या अवलियाचे धोरण आहे. बाबा स्वत: पैसे मोजून रोपटी विकत आणून या मुलांकडून त्याचे रोपण करून घेतात. हे सर्व सांगण्याचे कारण, नुकतेच राज्यात मोठा गाजावाजा करून झालेले वृक्षारोपण. राज्याच्या वनखात्याने यंदा मोठा लोकसहभाग असलेली ही वृक्षलागवडीची मोहीम निदान पहिल्या टप्प्यात तरी यशस्वी करून दाखवली, असे म्हणता येईल. कारण, इतर वेळच्या तुलनेत यावेळी लोकांचा सहभाग उत्स्फूर्त व मोठा होता. लोक सध्या समाजमाध्यमांपायी वेडे झाले आहेत. राज्याच्या वनमंत्र्यांनी अगदी चतुराईने या मोहिमेला या वेडेपणाशी जोडले, त्यामुळे आजवर झाडे पायदळी तुडवणारी मंडळी सुद्धा यावेळी झाडे लावताना दिसली. झाडे लावतानाचा हा उत्साह ती झाडे टिकवणे, जगवणे व मोठी करण्यापर्यंत टिकेल का, हा प्रश्न सध्या अनेकांना सतावत आहे. झाडे लावल्यावर मोठय़ा उत्साहात त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर फिरवणारे आता खरेच लावलेल्या झाडांची काळजी घेत आहेत का? आता दोन आठवडय़ानंतर या झाडांची अवस्था कशी आहे? रोपण करताना मोठय़ा उत्साहात स्वत:ला मिरवणारे आताही तोच उत्साह कायम ठेवून आहेत की, त्यांचे दुर्लक्ष झाले आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले की, मग शंकरबाबा आठवतात. रोपण करताना लावलेली किमान ४० टक्के झाडे जरी वाचली तरी ते वृक्षारोपण यशस्वी म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या हेच मानक आहे. आजवर सरकारी पातळीवर हाती घेण्यात आलेल्या मोहिमा ४० टक्क्यांचा पल्ला गाठू शकलेल्या नाहीत, हे वास्तव आहे. या पाश्र्वभूमीवर शंकरबाबांची कामगिरी उजवी व आंतरराष्ट्रीय मानकाला सुद्धा लाजवेल, अशी आहे.

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

बाबा व त्यांच्या मुलांनी लावलेली झाडे क्वचितच गायब होतात. गेल्या दहा वर्षांत या मुलांनी लावलेली बहुतांश झाडे जगलेली आहेत. कोणत्या वर्षी कोणती झाडे लावली व आता त्याची स्थिती काय, हे या जंगलात फिरताना बाबा मोठय़ा उत्साहाने दाखवतात. या झाडांना पाणी मिळावे म्हणून टय़ूबवेल लावण्याचा खर्च बाबांना झेपणारा नाही, त्यामुळे त्यांनी निसर्गाचेच पाणी अगदी योग्य पद्धतीने जिरवून ही झाडे जगवली आहेत. बाबा आणि त्यांच्या परिवारातील मुलांसाठी हे जंगल आता जगण्याचे साधन बनले आहे. आवळा, सीताफळ, करवंद व इतर अनेक वनौषधींसाठी आवश्यक असलेल्या झाडांची फळे विकून बाबांचा आश्रम वर्षांला पाच लाख रुपये कमावतो. तीन वर्षांंपूर्वी बाबांनी विशिष्ट प्रकारच्या गोंदाचे उत्पादन देणाऱ्या कढई प्रजातीची शेकडो झाडे लावली. हा गोंद बाजारात १० हजार रुपये किलोने विकला जातो. गर्भवतींसाठी तो उपयुक्त समजला जातो. यंदापासून या आश्रमाने ही गोंदविक्री सुरू केली आहे. पावसाळ्यात वृक्षारोपण झाले की, वर्षभर या झाडांची निगा आश्रमातील मुलेच राखतात. त्यासाठी प्रत्येकाला झाडे वाटून देण्यात आली आहेत. हीच झाडे आपल्याला जगवत आहे, हे प्रत्येकाच्या मनावर बिंबवून देण्यात आले आहे, त्यामुळे या मुलांनाही झाडांचा लळा लागला आहे. या अनाथ मुलांच्या आयुष्यात आईवडिलांचे प्रेम वाटय़ाला आलेले नाही. त्यांच्यातील व्यंग नातेवाईक दुरावण्यास कारणीभूत ठरले. आता ही झाडेच त्यांची गणगोत झाली आहेत. यावेळी एक जुलैला वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होताना राज्यभर सेल्फीला अगदी ऊत आला होता. अनेक भल्याभल्यांना हा मोह आवरता आला नाही. या आश्रमातील मुले मात्र या तंत्रज्ञानापासून दूर आहेत, त्यामुळेच त्यांचा झाड जगवण्याविषयीचा जिव्हाळा कृत्रिम नसून अस्सल आहे. या मुलांना प्रसिद्धीची हौस नाही, ती काय असते, हेही ठाऊक नाही. प्रसिद्धीचे वलय कळण्याइतपत त्यांची बौद्धिक क्षमताही नाही. ही झाडेच आपला जीवनाधार आहे, त्यामुळे ते टिकवले तर चार पैसे मिळतील व आश्रमाचा आर्थिक गाडा रुळावर राहील, हे वास्तव या मुलांना ठाऊक आहे. त्यातून हे जंगल उभे ठाकले आहे. २६२ प्रजातींची झाडे येथे डौलाने उभी आहेत व दरवर्षीच्या पावसाळ्यात त्यात आणखी काही झाडांची भर पडतेच आहे. ‘एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष’ असे म्हणत सरकारी मोहिमेत सामील झालेल्या व प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्यांसाठी या अवलिया बाबा व त्यांच्या मुलांनी एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे. वनखात्यातील अनेकांना हा सातपुडय़ाच्या पायथ्याशी आकाराला आलेला समृद्ध जंगलाचा प्रयोग ठाऊक देखील नाही. सेल्फीच्या नादात हरवलेली, पण या मोहिमेत किमान एक दिवसासाठी का होईना, सामील झालेली नवी पिढी या प्रयोगापासून दूर आहे. अशी कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल, तर आदर्श उदाहरणांची गरज पडतेच. ते शंकरबाबा व त्यांच्या ‘ग्रीनआर्मी’ने ते उभे केले आहे, त्यामुळे वृक्षलागवडीवर भरभरून व्यक्त होणाऱ्या पांढरपेशांनी एकदा या वझ्झरला जायला काय हरकत आहे?

– देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com