नागपूर : ऐतिहासिक अशा नागपूर जिल्ह्याला अनेक परंपरांसोबत शंकरपटाचीही परंपरा आहे. जिल्ह्यातील सावरगावमध्ये शिंदे कुटुंबियांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या शंकरपटाला ७१ वर्षांची परंपरा असून येत्या रविवारी होणाऱ्या शंकरपटात दीडशेहून अधिक जोड्या एकाचवेळी धावणार आहेत. सुमारे पन्नास हजार लोकांच्या उपस्थित होणाऱ्या या शंकरपटाकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
काटोलचे माजी आमदार दिवंगत सुनील शिंदे यांनी त्यांच्या सावरगावमध्ये शंकरपट आयोजनाची पंरपरा सुरू केली. न्यायालयाने बंदी आणल्यानंतरच्या वर्षाचा अपवाद सोडला, तर मागील ७१ वर्षांपासून ही पंरपरा अखंडितपणे सुरू आहे. सुनील शिंदे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र व माजी कृषी सभापती सुनील शिंदे यांनी ही पंरपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या नेृत्वात १२ व १३ मार्च रोजी सावरगाव येथे भव्य शंकरपट व कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हेही वाचा – महाविकास आघाडीमध्ये सध्या शिवसेना आहे कुठे? दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका
हेही वाचा – साडेतीन हजार शिक्षक विद्यापीठाच्या मतदानाला मुकणार? एकाच दिवशी दोन निवडणुकांमुळे चिंता
या कार्यक्रमाला काटोलचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह शंकरपट आयोजन स मितीचे अध्यक्ष रमेश रेवतकर यांच्या उपस्थितीत शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. या शंकरपटात १५० हून अधिक जोड्या सहभागी होणार असून, हा सोहोळा बघण्यासाठी दोन दिवस मिळून सुमारे पन्नास हजार लोक सावरगावमध्ये येणार असल्याचे शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. सुमारे पन्नास लाखांहून अधिक किंमतीच्या जोड्या या शंकरपटात धावतात, असे शिंदे म्हणाले.