वर्धा जिल्ह्यातील विविध औद्योगिक समस्यांची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कप्रमुख माजी खासदार सुबोध मोहिते यांनी सांगितले आहे.
गत आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्धेतील दौऱ्यात व्यावसायिकांची भेट घेतली होती. माेहिते यांनी ‘व्यापारी संवाद’ घडवून आणला होता. त्यात व्यापारीबंधूंनी विविध समस्या मांडल्या होत्या. कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग या जिल्ह्यात यावे. टेक्सटाईल पार्क व्हावा. वर्धा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे. सेवाग्राम येथे आंतरराष्ट्रीय शांतीस्थळ व पर्यटन केंद्र उभारण्यात यावे, अशा व अन्य मागण्या पवारांपुढे ठेवण्यात आल्या. त्यावर शिष्टमंडळासह दिल्लीत येण्याचे पवार यांनी व्यापारी मंडळींना सुचवले. मात्र, दरम्यान १७ फेब्रुवारीला पवार यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीत वर्धेतील प्रस्तावाची माहिती दिली.
हेही वाचा- मंत्री मुनगंटीवार ढोलताशा वाजवतात तेव्हा…
तसेच वर्धेत भेट देण्याचे निमंत्रण त्यांनी मान्य केले. ही माहिती पवार यांनी आपणास दिल्याचे मोहिते यांनी नमूद केले. आता वर्धा व्यापारी संघटना पंतप्रधान मोदी यांना अधिकृत निमंत्रण पाठवणार असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी हे प्रस्ताव मान्य केल्यास वर्धा जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.