दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येऊन गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याचे कवित्व सुरूच आहे. या दौऱ्यात त्यांना शेतकऱ्यांचा संताप सहन करावा लागला, याच मुद्दावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर देणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर आणि पंतप्रधानांची भेट झाली तर (मोदी बहुतांश वेळी विदेश दौऱ्यावर असल्याने) शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या कानावर टाकू, असे सांगून पवार यांच्या दौऱ्याचा समारोप झाला.
शेतकऱ्यांशी संवाद, पक्ष बळकटीला चालना, क्रिकेट संघटनेच्या घडामोडींमध्ये सहभाग अशा ठळक घडामोडी पवार यांच्या दौऱ्यादरम्यान घडल्या. पवार यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि त्यांची स्वत:ची राजकारण करण्याची शैली लक्षात घेतली तर त्यांचा हा दौरा निश्चित उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच केलेला होता. हे स्पष्ट होते.
राजकारणा इतकाच कृषी क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले पवार हे त्यांच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती असूनही यवतमाळ जिल्ह्य़ाची दौऱ्यासाठी निवड करतात, त्यांच्या संतप्त भावनाही ऐकून घेतात यावरून त्यांना त्याच्याविषयीची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न लक्षात येतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात पवार यांची भूमिका त्यावेळी महत्त्वाची होती. मात्र, त्याचा फायदा विदर्भाला झाला नाही हे सुद्धा त्यांना माहिती होते. याच मुद्दावर त्यांना दौऱ्यादरम्यान जाबही विचारण्यात आल्यावर त्यांनी ही बाब मान्यही केली. खतावरील अनुदान बंद करण्याच्या तत्कालीन केंद्र सरकारच्या निर्णयावरही व्यक्त करण्यात आलेल्या नाराजीला त्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी आपली बाजू शेतकऱ्यांपुढे मांडून व त्यांच्यासाठी पुन्हा कर्जमाफीची मागणी करून अजूनही आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचा संदेश त्यांनी दिला. ग्रामीण राजकारणाची खडा न खडा माहिती असणाऱ्या पवार यांनी या दौऱ्यात त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनाही भेटून सक्रिय करण्याचे प्रयत्न केले. नेत्यांवर होणारे गैरव्यवहाराचे आरोप, त्यामुळे मलीन झालेली पक्षाची प्रतिमा आणि पराभवामुळे आलेले नैराश्य यामुळे पक्षात एक प्रकारची स्तब्धता आली होती. पवार यांनी त्यांच्या दौऱ्यातून दूर करण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही पक्ष वाढविण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र, स्थानिक नेत्यांच्या व्यक्तीकेंद्रित भूमिकेमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या दौऱ्यात त्यांनी जुने आणि नव्याना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिला. त्यांच्या नागपुरातील कार्यक्रमातून ही बाब प्रतिबिंबित झाली.
पवार म्हणचे चर्चा, पवार म्हणजे बातमीचा विषय, पवार जेथे जातील तेथे माणसांचे मोहोळ असे चित्र आजही कायम असल्याचा प्रत्यय याही दौऱ्यात आला. दौऱ्याच्या व्यस्त कार्यक्रमातही त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केल्याने शेती की क्रिकेट हा नवा वाद निर्माण झाला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीस आणि मोदींवर मिष्कील टीका करतानाच पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बसने पसंत केले. यामुळे पवार यांची नेमकी भूमिका काय असाही प्रश्न चर्चेला आला. सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे त्यातील घोटाळ्यावर त्यांनी बोलणे टाळले. पवार यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या वक्तव्याचेही वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्यामुळे त्याचे कवित्व सुरू असते.
संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत मराठवाडय़ापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दौऱ्याला सुरुवात करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भात आल्यावर अंशत: कर्जमाफीची मागणी करून गेले. त्यांच्या या ‘यू टर्न’ मागे कोणते राजकारण दडले आहे, याची चर्चा सध्या वैदर्भीय राजकीय वर्तुळात सुरू आहे.

.. मग बिहार, किक्रेटवर तरी भाष्य का?
न.मा. जोशी, यवतमाळ
विदर्भाच्या दौऱ्यात केवळ शेतकरी आत्महत्यांची कारणे जाणून घेणे हा एकमेव उद्देश असल्याने अन्य कोणत्याही प्रश्नांची चर्चा आपण करणार नाही, असे वार्ताहर परिषदेत सांगणाऱ्या राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना अखेर किक्रेट आणि बिहार निवडणुकीसारख्या विषयांवर भाष्य का करावे लागले, तसेच संपूर्ण कर्जमाफीचा विषय का सोडून द्यावा लागला, या प्रश्नांचीोता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
विशेष हे की, संपूर्ण कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा तरणोपाय नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याशिवाय थांबणार नाही, असे सर्वप्रथम शरद पवार यांनीच सांगितले होते. शरद पवारांची री ओढत कांॅग्रेसने राज्यभर िपप्री बुटीतून कर्जमुक्ती आंदोलन सुरू केले होते. शरद पवारांनी मात्र याच िपप्री गावात संपूर्ण कर्जमाफीची आवश्यकता नाही. प्रत्येक ठिकाणची पीक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा विचार मांडला आणि मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या या संदर्भातील विचाराचे समर्थन करून आपल्या विचारांची जवळीक असलेल्या कांॅग्रेसची चांगलीच गोची करून टाकली. बिहार निवडणूक आणि किक्रेटसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नसल्याचे वार्ताहरांना सांगणाऱ्या शरद पवारांनी नागपुरात मात्र दोन्ही विषयांवर चर्चा केली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी त्यांची माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी नागपुरात भेट घेतली. श्रीनिवासन आले आणि पवारांशी चर्चा करून बंगळुरूला निघून गेले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही शरद पवारांनी भाष्य केले आणि त्रिकोणी संघर्षांत कोण बाजी मारणार, हे सांगणे फार अवघड असल्याची प्रतिक्रिया दिली. लालू, नितीश युतीपासून आपण फारगत का घेतली, याचीही कारणमीमांसा त्यांनी नागपुरात केली. जागा वाटपात आम्हाला लालू, नितीश यांनी विश्वासात घेतले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
केवळ शेतकरी आत्महत्यांचाच विषय आपल्या विदर्भ दौऱ्यात आहे, असे म्हणततानाच बिहार आणि किक्रेटसारख्या विषयांवर पवारांना भाष्य का करावे लागले, हे बाकी अनाकलनीय आहे.

Story img Loader