दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येऊन गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याचे कवित्व सुरूच आहे. या दौऱ्यात त्यांना शेतकऱ्यांचा संताप सहन करावा लागला, याच मुद्दावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर देणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर आणि पंतप्रधानांची भेट झाली तर (मोदी बहुतांश वेळी विदेश दौऱ्यावर असल्याने) शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या कानावर टाकू, असे सांगून पवार यांच्या दौऱ्याचा समारोप झाला.
शेतकऱ्यांशी संवाद, पक्ष बळकटीला चालना, क्रिकेट संघटनेच्या घडामोडींमध्ये सहभाग अशा ठळक घडामोडी पवार यांच्या दौऱ्यादरम्यान घडल्या. पवार यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि त्यांची स्वत:ची राजकारण करण्याची शैली लक्षात घेतली तर त्यांचा हा दौरा निश्चित उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच केलेला होता. हे स्पष्ट होते.
राजकारणा इतकाच कृषी क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले पवार हे त्यांच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती असूनही यवतमाळ जिल्ह्य़ाची दौऱ्यासाठी निवड करतात, त्यांच्या संतप्त भावनाही ऐकून घेतात यावरून त्यांना त्याच्याविषयीची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न लक्षात येतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात पवार यांची भूमिका त्यावेळी महत्त्वाची होती. मात्र, त्याचा फायदा विदर्भाला झाला नाही हे सुद्धा त्यांना माहिती होते. याच मुद्दावर त्यांना दौऱ्यादरम्यान जाबही विचारण्यात आल्यावर त्यांनी ही बाब मान्यही केली. खतावरील अनुदान बंद करण्याच्या तत्कालीन केंद्र सरकारच्या निर्णयावरही व्यक्त करण्यात आलेल्या नाराजीला त्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी आपली बाजू शेतकऱ्यांपुढे मांडून व त्यांच्यासाठी पुन्हा कर्जमाफीची मागणी करून अजूनही आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचा संदेश त्यांनी दिला. ग्रामीण राजकारणाची खडा न खडा माहिती असणाऱ्या पवार यांनी या दौऱ्यात त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनाही भेटून सक्रिय करण्याचे प्रयत्न केले. नेत्यांवर होणारे गैरव्यवहाराचे आरोप, त्यामुळे मलीन झालेली पक्षाची प्रतिमा आणि पराभवामुळे आलेले नैराश्य यामुळे पक्षात एक प्रकारची स्तब्धता आली होती. पवार यांनी त्यांच्या दौऱ्यातून दूर करण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही पक्ष वाढविण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र, स्थानिक नेत्यांच्या व्यक्तीकेंद्रित भूमिकेमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या दौऱ्यात त्यांनी जुने आणि नव्याना सोबत घेऊन जाण्याचा संदेश दिला. त्यांच्या नागपुरातील कार्यक्रमातून ही बाब प्रतिबिंबित झाली.
पवार म्हणचे चर्चा, पवार म्हणजे बातमीचा विषय, पवार जेथे जातील तेथे माणसांचे मोहोळ असे चित्र आजही कायम असल्याचा प्रत्यय याही दौऱ्यात आला. दौऱ्याच्या व्यस्त कार्यक्रमातही त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केल्याने शेती की क्रिकेट हा नवा वाद निर्माण झाला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीस आणि मोदींवर मिष्कील टीका करतानाच पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बसने पसंत केले. यामुळे पवार यांची नेमकी भूमिका काय असाही प्रश्न चर्चेला आला. सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे त्यातील घोटाळ्यावर त्यांनी बोलणे टाळले. पवार यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या वक्तव्याचेही वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्यामुळे त्याचे कवित्व सुरू असते.
संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत मराठवाडय़ापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दौऱ्याला सुरुवात करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भात आल्यावर अंशत: कर्जमाफीची मागणी करून गेले. त्यांच्या या ‘यू टर्न’ मागे कोणते राजकारण दडले आहे, याची चर्चा सध्या वैदर्भीय राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पवारांच्या विदर्भ दौऱ्याचे कवित्व सुरूच
दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येऊन गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याचे कवित्व सुरूच आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-09-2015 at 05:26 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar face farmers anger during vidarbha visit