नागपूर : आरक्षणाच्या मुद्यांवर मराठा समाज आक्रमक झाला असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्य सरकार आंदोलकांशी चर्चा, बैठका आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, आंदोलकांनी अध्यादेश काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे जाहीर केल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने तापलेले हे प्रकरण अजूनही शांत झालेले नसताना शहर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) आज या आंदोलनात उडी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज सोमवारी नागपुरातील व्हेरायटी चौकात घटनेचा निषेध केला. या आंदोलनात शेखर सावरबांधे, अफजल फारुकी, जानबा मस्के, रमेश फुले, रेखा ताई कुपाले, नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, राजा बेग, मोरेश्वर जाधव, महेंद्र भांगे, राजू सिंग चौहान, रिजवान अंसारी, तनुज चौबे, अर्शद सिद्दिकी, अशोक काटले, कपिल अवारे, अश्विन जवेरी, प्रशांत बनकर, निलेश बोरकर, वसीम लाला, आशुतोष बेलेकर, रुपेश बांगळे, सुनील लांजेवार, नंदू माटे, नागेश वानखेडे सहभागी झाले होते.
हेही वाचा – यवतमाळ : नदी पात्रात अडकलेल्या इसमाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले
हेही वाचा – बैलगाडीवर वीज कोसळली; महिला ठार, दोघे जखमी
शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, उपोषणाला बसलेल्यांना आरक्षण हवे आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते यांनी आरक्षण देऊ असे म्हटले होते. पण केंद्रात आणि राज्यात सरकार असूनही आरक्षण देत नाही. उलट आंदोलकांवर लाठीमार केला जातो. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी असे सरकार काम करत आहे का? असा सवाल करीत या प्रकरणी खोके सरकारने व देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.