शरद पवार म्हणजे जपानी बाहुलीसारखे आहेत असं एक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी हे आपल्या दिलखुलास आणि खास नागपुरी शैलीतल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भाजपाचा नागपूर ग्रामीण कार्यकर्ता मेळावा होता. त्यात बोलत असताना गडकरींनी शरद पवारांना जपानी बाहुलीची उपमा दिली आहे. ज्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन गडकरी नेमकं काय म्हणालेत?

“पान ठेल्यावर एक जपानी गुडिया असते. कुणी कुठल्याही दिशेने असलं तरी ती डोळा मारायची. पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की ती माझ्याकडे पाहूनच डोळा मारते. शरद पवारही अगदी असेच आहेत. प्रत्येकाला पाहतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की त्यांनी मलाच डोळा मारला. मग कार्यकर्ते कामाला लागतात, पुढच्या वेळी मीच असं त्यांना वाटत असतं आणि भलत्यालाच तिकिट मिळतं. “

थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट. मिळालं तर बोनस आणि नाही मिळालं तर दुःख करायचं नाही या मनस्थितीत प्रत्येकाने काम करा असाही सल्लाही नितीन गडकरींनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

चॉकलेटचा भन्नाट किस्सा

माझ्याकडे परवा अमूल कंपनीचे अध्यक्ष आले होते. त्यांच्या बरोबर स्विर्त्झंलडमधल्या चॉकलेट कंपनीचे मालक आले होते. जो स्वीस मालक होता त्याची पत्नी भोपाळची आहे. तिचं आडनाव शर्मा, मला त्यांनी खूप चॉकलेट्स आणून दिले. त्यावर मी गंमतीने त्या स्वीस चॉकलेट कंपनीच्या मालकाला सांगितलं की हे चॉकलेट्स माझ्यासाठी खूप उपयोगाचे आहेत. तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला चॉकलेट्स आवडतात का? मी म्हटलं हो चॉकलेट्स मला आवडतातच. पण या चॉकलेट्सचे खूप फायदे आहेत. तर त्या मालकाने मला विचारलं कसं काय? त्यावर मी म्हणालो मी आता लोकांना वाटणार आहे. जो जो चॉकलेट चघळेल तो तो म्हणेल काय बेस्ट चॉकलेट आहे गडकरींनी दिलं आहे. असं म्हणत भन्नाट किस्साही सांगितला.

कार्यकर्ते टिकवण्यासाठी चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो

कार्यकर्ते टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे बावनकुळे चॉकलेट वाटत नाहीत. तरी सल्ला देतो, चांगले मिळण्याची अपेक्षा करा, पण नाही मिळाले तर दुःख नाही अशा पद्धतीने कामाचा आनंद घेत रहा. कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, आपल्याला जेव्हा जबाबदारी मिळते ती आपण प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. अध्यक्ष हा माजी अध्यक्ष होतो, खासदार हा माजी खासदार होतो, पण कार्यकर्ता हा कधीच माजी कार्यकर्ता होत नाही, तर कार्यकर्ता हा कायम कार्यकर्ता असतो, असेही गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar is like japanese doll everyone thinks looks at us scj
Show comments