राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी  धरला होता. यामुळेच राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना  पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १२ जुलै रोजी केली. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल होते. याच पाठिंब्यावर आता पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की वाचा >> राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…”

शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवारांनी भाषणानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेमध्ये पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे, यावर तुमचं काय मत आहे, असा प्रश्न पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नावर पवार यांनी स्पष्टपणे प्रत्येक राजकीय पक्षाला निर्णय स्वातंत्र्य असते असं सांगितलं. “प्रत्येक राजकीय पक्षाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी पाठिंबा द्यायाच निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आमचं त्यावर काही म्हणणं नाही,” असं पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर”; शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप, राणेंसोबतच्या वादावरुन शिवसेनेचा टोला

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (११ जुलै रोजी) पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर घेतली होती. त्यात शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका अनेक खासदारांनी मांडली होती. निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरे यांना देण्यात आले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा कसलाही दबाव माझ्यावर नव्हता. कोणालाही पाठिंबा जाहीर करा, असे खासदारांनी मला सांगितले होते, असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले.

नक्की वाचा >> “ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून…”; ‘बाळासाहेबांचे शिवसैनिक स्वाभिमानी होते’ म्हणत सुप्रिया सुळेंचा शिंदेंना टोला

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, पालघरच्या निर्मला गावित अशा आदिवासी समाजात काम करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली असून आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा आग्रह या शिवसैनिकांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्ष-आघाडी न पाहता व्यापक विचार करून पाठिंबा देणे ही शिवसेनेची परंपरा आहे. प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्रातील उमेदवार म्हणून तर प्रणव मुखर्जी यांना त्यांचा राजकीय अनुभव, ज्ञान व देशपातळीवरील प्रतिमा लक्षात घेऊन शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तीच परंपरा कायम ठेवत आता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता द्रौपदी मुर्मू या भाजपच्या उमेदवार असल्याने त्यांना मी विरोध करायला हवा होता. पण, मी तेवढय़ा कोत्या मनाचा नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

Story img Loader