राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नियोजित वर्धा दौऱ्यावरून आज चांगलाच भडका उडाला. माजी खासदार सुबोध मोहिते यांचे वर्चस्व दिसून आल्याने संतप्त सहकार गटाने चांगलीच आगपाखड केली. येत्या रविवारी पवार वर्धा दौऱ्यावर येत असून दोन राजकीय कार्यक्रमाचा संदर्भ फक्त मोहिते यांच्याशी जोडण्यात आला आहे.
कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून शिववैभव सभागृहात दुपारी सभा झाली. त्यात जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ज्येष्ठ नेते किशोर माथनकर, समीर देशमुख यांनी मोहिते यांच्यावर तोंडसुख घेतले. तुम्ही दौरा विश्वासात न घेता ठरवता. आम्हास ढुंकूनही विचारात नाही. ज्येष्ठ नेत्यांना चुकीची माहिती देत स्वतःकडे मोठेपणा घेता. विद्यमान सर्व पदाधिकाऱ्यांना बदलण्याचा इशारा देता. तुम्ही चार-पाच पक्ष बदलून इथे अखेर आश्रय घेतला. अन पक्षप्रेमच्या गप्पा करता, कुणाला हे सांगता असा जाब माथनकर यांनी विचारला.
हेही वाचा >>>चंद्रपूर : शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाने घेतला घास! जंगलात लांब फरफटत नेले
मोहिते हे निमूटपणे ऎकत होते. आगपाखड झाल्यावर ते निघून गेले. सुरुवातीलाच त्यांचे भाषण झाल्याची माहिती मिळाली. पक्षात असा भडका उडाल्याने पवार यांना आगामी दौऱ्यात वादाला सामोरे जावे लागणार का, अशी चर्चा सुरू झाली. याविषयी बोलताना सुबोध मोहिते म्हणाले की भावना व्यक्त झाल्या. बाकी फारसे काही नाही.