नागपूर : अर्थसंकल्पाचे विरोधकांनी कधीतरी स्वागत केले आहे का? ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात काय दिले? खरे तर राज्यात काही चांगले निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेतले जात असतील तर मोठेपणा दाखवून त्याचे स्वागत केले पाहिजे. मात्र प्रत्येकवेळी विरोधकांच्या नजरेत अंगुर खट्टेच असतात, अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पटेल नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. प्रत्येक घटकाला त्यांचे भविष्य घडविण्यासाठी या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. अनेक योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. महिलांसाठी, युवकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत, असे सांगून शरद पवार यांचे नाव न घेता पटेल म्हणाले, एका राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने तरी या अर्थसंकल्पाचे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यावेळी त्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी राज्याला काय दिले? कापूस, दुधाचे भाव, वीज यामध्ये घसरण होते. त्याबद्दल तरतूद करण्यात आली आहे. भगिनींना सरकारतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प निवडणुकीसाठी नाही तर अनेक पैलूंचा विचार करून सादर केला आहे, असेही पटेल म्हणाले.

हेही वाचा – चंद्रपूर : आधी पोटच्या गोळ्याला विष पाजले, मग स्वतः घेतला गळफास; त्या मातेने का उचलले टोकाचे पाऊल?

दिल्ली विमानतळाच्या अपघाताबाबत पटेल म्हणाले, दिल्लीचे विमानतळ २००८ ते २००९ या काळात बांधले गेले आहे. पंधरा-सोळा वर्षांनंतर कोणती घटना घडली तर त्या काळातील व्यक्ती जबाबदार असतो असे नाही. जे झाले ते दुर्दैवी आहे. आम्हालाही त्याचे दुःख आहे. जी घटना घडली त्याची सरकारकडून चौकशी केली जात आहे त्यामुळे आपण वाट बघावी. या घटनेसंबंधी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र पंधरा वर्षांनंतर घडलेल्या घटनेचा कोणावर ठपका ठेवणे योग्य नाही, असेही पटेल म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ : सावकाराचे अपहरण केले, खंडणीची रक्कम ठरली, हातात नोटांची पिशवी येणार एवढ्यात…

विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उद्या रविवारी अजित पवारांनी संसदीय मंडळाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काहीच निर्णय होणार नाही. एकत्र लढणार आहोत. जागेचे वाटप होणार आणि महायुती म्हणून लोकांचे आशीर्वाद मागण्यासाठी जाणार आहोत. राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reaction on maharashtra budget criticism of praful patel vmb 67 ssb