बुलढाणा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमुखी नेतृत्व असलेल्या आमदार राजेंद्र शिंगणेंनी ‘यु टर्न’ घेत अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मन वळविण्याचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अपयशी ठरला.
लागोपाठ दोन दिवस ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणारे माजीमंत्री शिंगणे यांनी डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेच्या मुद्यावरून, अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज ७ जुलैला सकाळी ते ठाम निर्णयाप्रत आले. यावेळी ते बुलढाण्यातील आपल्या निवासस्थानी होते. मोबाईल बंद करून ते ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ जरी असले तरी सिंदखेड राजा मतदारसंघासह जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची मने जाणून घेत होते. दरम्यान त्यांच्या निर्णयाची माहिती प्रसिद्धी माध्यमे व अन्य माध्यमाद्वारे मुंबई पर्यंत पोहोचली.
हेही वाचा >>> चंद्रपूर : “स्वत:ला आमदार म्हणवून घ्यायची लाज वाटते”, असं का म्हणाले विजय वडेट्टीवार?
त्यावेळी ‘सिल्वर ओक’ या आपल्या निवासस्थानी असलेल्या शरद पवारांनी यावेळी तिथे उपस्थित जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या निर्णयाने नाराज झालेल्या शरद पवारांनी ‘त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करा’ अथवा आता सर्व मिळून जिल्ह्यात पक्ष सांभाळा’ असे सांगितले. मात्र, आमदार शिंगणेंचा भ्रमणध्वनी ‘स्विच ऑफ’ आला. यावेळी तिथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.