वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यासोबत चर्चा केली आहे, पण तूर्तास कर्नाटक राज्यात ज्या जागांवर परस्पर विरोधी उमेदवार नाहीत, त्या ठिकाणी युती केली जाऊ शकते, असा प्रस्ताव आंबेडकर यांनी दिला आहे. त्यावर अंतिम निर्णय लवकरच होईल. तथापि, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची की नाही, याबाबतीत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी येथे रविवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत महात्मा फुले अॅग्रिकल्चरल फोरमच्या वतीने अमरावतीत आयोजित कृषी पदवीधरांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुनरूच्चार केला.
शरद पवार म्हणाले, भाजपला फोडाफोडीचे राजकारण करायचे असेल, तर करू द्या, आम्ही आमची भूमिका घेऊ. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असे आपले आजही मत आहे. संयुक्त संसदीय सदस्यांच्या समितीत दोन्ही सभागृहांचे नेते असतात. ज्या पक्षांचे सदस्य जास्त त्यांना या समितीत जास्त जागा मिळतात. विरोधकांचे सदस्य कमी, सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असेच चित्र असते. अशा प्रकारची समिती नेमल्यानंतर सत्य कसे बाहेर येणार? अदाणी प्रकरणाची चौकशी गांभीर्याने व्हायला हवी. त्यामुळे जेपीसी अर्थात संसदीय संयुक्त समितीच्या ऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने चौकशी करावी अशीच आमची मागणी आहे. माझा जेपीसीला विरोध नाही पण जेपीसी ही बहुमत बळावर काम करणारी समिती आहे. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती प्रभावी ठरेल, पण तरीही जर सर्व विरोधी पक्ष जेपीसीच्या मागणीवर ठाम असतील, तर आपला त्याला विरोध नाही, असे शरद पवार म्हणाले. गौतम अदानींनी त्यांची भेट घेतल्याच्या मुद्यावर त्यांनी बोलणे टाळले.
शरद पवार म्हणाले, अॅड प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आपली चर्चा झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यसा अनुषंगाने त्यांनी प्रस्ताव दिला आहे. ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी देणार आहेत, आम्ही आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देऊ. ज्या जागांवर परस्पर विरोधी उमेदवार नाहीत, अशा ठिकाणी युती करता येईल, असे पवार यांनी सांगितले.