वर्धा : राज्यात अव्वल समजल्या जाणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांच्या सर्वपक्षीय मधुर संबंधांमुळे त्यांना ‘हिंगणघाटचे शरद पवार’ म्हटल्या जाते. तिकीट नं मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडून माजी आमदार राजू तिमांडे यांना बंडखोर म्हणून रिंगणात उतरवले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अतुल वांदिले अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते.

या पार्श्वभूमीवार विदर्भ दौऱ्यावर असलेले शरद पवार हे खास हिंगणघाट येथे प्रचार सभेसाठी आलेत. येण्यापूर्वी त्यांनी सुधीर कोठारी यांना सूचित केले होते की भेटायला येणार, गावातच थांब. तसा शब्द देत आज शरद पवार हे सभेपूर्वी थेट कोठारी यांच्या घरी पोहचले. या भेटीत कोठारी यांनी आपली व्यथा मांडली. ते पवारांना म्हणाले की, आम्ही लोकांनी आयुष्यभर तुम्हास साथ दिली. सुरुवातीस पक्ष स्थापन केला तेव्हा व आता अजित पवार सोडून गेले तेव्हाही सोबतच आहोत. खरं तर अजित पवार यांच्याशी माझे सहकार संस्थांमुळे चांगले संबंध राहिले. पण त्याचा विचार न करता मी तुमच्यासोबत चालण्याचा निर्णय घेतला. पण या निवडणुकीत मला डावलले, त्याची नाराजी आहे. पक्षाचे घर बांधले आम्ही आणि वेळेवर येऊन केवळ त्यास रंग मारणारे आणि घर मी छान केले, असे म्हणणारे आता मोठे झाले. हे सहन झाले नाही म्हणून आम्ही वेगळा मार्ग स्वीकाराला, अशी भावना व्यक्त केल्याचे कोठारी म्हणाले. त्यावर बघू, पुढे काय करता येईल ते, एवढेच उत्तर देत शरद पवार यांनी पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी सहज टिपणी केल्याचे समजले.

हेही वाचा – ‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप

हेही वाचा – उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

यावेळी उपस्थित माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही अधिकृत उमेदवार निवडून आणा, अशी गळ घातली. डॉ. निर्मेश कोठारी हे या भेटीत उपस्थित होते. मात्र पवार यांच्या सूचनेवर पुढे काय करणार, याविषयी कोठारी यांनी भाष्य टाळले. पवार यापूर्वी पाच वेळा हिंगणघाटला येऊन गेलेत. तेव्हा प्रत्येकवेळी कोठारी त्यांच्या स्वागतास पोहचत. मात्र वेगळा राजकीय पवित्रा कोठारी यांनी घेतल्याने आज ते ज्यांना गुरु मानतात ते पवार स्वतःच दारी आल्याचा वेगळा आनंद कोठारी परिवाराने अनुभवला, अशी चर्चा आहे. या भेटीतून पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.