कविता नागापुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील सर्वच बड्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. तर दोनच दिवसांआधी राष्ट्रवादीच्या काही आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना भेटून ते शरद पवारांचे समर्थक असल्याचे स्पष्ट केले.

मात्र आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज अर्थ खाते मिळताच या शरद पवार समर्थकांनी यू टर्न घेतला असून त्यांपैकी काही जणांनी आज पुन्हा प्रफुल पटेल यांची भेट घेत अजित पवारांना समर्थन दिल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आम्हाला खासदार प्रफुल पटेल यांचेच नेतृत्व मान्य असल्याची कबुलीही त्यांनी दिल्याचे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल व अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये विलीन झाले. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडुन दोन गट निर्माण झाले. या दरम्यान तुमसर व मोहाडी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांना खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतचे छायाचित्र माध्यमात प्रसिध्द करुन खा. पवार यांना समर्थन जाहीर करण्यात आले.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

मात्र आज अजित पवार यांना अर्थ खाते मिळताच यातील काही पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही खा. पटेल व  अजित पवार यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित राहू तसेच खा. पटेल यांचेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे’ असे स्पष्ट करीत त्यांनी त्या वृत्ताला फेटाळून लावले असल्याचे बोलले जात आहे. प्रफुल पटेल यांच्यासोबत काढलेला त्यांचे छायाचित्र ही समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. जि.प. सदस्य राजेन्द्र ढबाले, जि.प. सदस्य राजु देशभ्रतार, तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, वरिष्ठ पदाधिकारी छगन पारधी यांनी मुंबई येथे खा. प्रफुल पटेल यांची भेट घेवुन आपले खुले समर्थन ही जाहीर केले असल्याचे बोलले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar supporters in the district u turn after ajit pawar portfolio distribution ksn 82 ysh
Show comments