वर्धा : आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवार हजर झाले. प्रथम शरद पवार यांचे सभास्थळी स्वाध्याय मंदिर येथे आगमन झाले. भाषण आटोपल्यावर ते गर्दीतून वाट काढत निघाले. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना त्यांच्या कारकडे वाट दाखविली. मात्र त्यात बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
अशी काही इच्छा शरद पवार व्यक्त करतील हे कोणाच्या ध्यानीमानी नव्हतेच. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. चढणार कसे असा प्रश्न आला. धावपळ झाली. मंदिरातील पायऱ्या असलेली शिडी आली. त्यावर चढून शरद पवार अखेर रथावर स्वार झालेच. हा त्यांचा उत्साह उपस्थित नेते तसेच पदाधिकारी यांना थक्क करून गेला.
हेही वाचा – “रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
हेही वाचा – राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
भर उन्हात लोकांना अभिवादन करीत शरद पवारांनी मिरवणुकीचा आनंद घेतला. त्यापूर्वी सभेत बोलताना ते म्हणाले की, ही गांधीजी यांची भूमी आहे. देशास लोकशाहीचा संदेश इथून गेला. चला आता एक इतिहास घडवू या. नवे परिवर्तन घडवू या. यावेळी अमर काळे यांचेही भाषण झाले. माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, अनिल देशमुख, प्रा. सुरेश देशमुख, नरेंद्र ठाकरे, राजू तिमांडे, अभिजित वंजारी, शेखर शेंडे, सुधीर कोठारी, चारुलता टोकस, वीरेंद्र जगताप व अन्य उपस्थित होते.