लोकसत्ता टीम

गोंदिया : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, यावर सुनावणी सुरू आहे. या पाश्वर्पभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची येथे बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्या आगामी बैठकीचे सुतोवाच करण्यात आले. यामुळे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात लवकरच शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. या सभेनंतर गोंदिया जिल्हा प्रफुल्ल पटेल की शरद पवार यापैकी कोणाचा समर्थक आहे, हे कळेल, असे शरद पवार गटाचे बजरंग परिहार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची नागपूर येथे नुकतीच बैठक झाली. सुळे यांनी गोंदिया जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात सांगितले. त्या अनुषंगाने पक्षातील संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. याकरिता पुढील आठवड्यात जिल्ह्याचे प्रभारी आ. रोहित पवार व आ. अनिल देशमुख दौ-यावर येणार आहेत. त्यानंतर शरद पवार यांची येवला आणि बीडसारखीच मोठी जंगी सभा गोंदियातही होणार आहे. काही नेत्यांनी वेगळा विचार करून गट स्थापन केला, तरी जनता व पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे येवला आणि बीड येथील सभेतून दिसून आले. गोंदिया जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे दिली आहेत. शरद पवार यांची सभा यशस्वी करण्याची पूर्वतयारी म्हणून पक्षबांधणी केली जात आहे, असे परिहार यांनी सांगितले.

आणखी वाचा-पोलिसाने केला महिलेचा विनयभंग; शेगावातील लज्जास्पद घटना

शरद पवार गटात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडून दबाव आणला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीनानाथ पडोळे, दिलीप पणकुले, सौरभ रोकडे उपस्थित होते.

Story img Loader