बुलढाणा : तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. या गुन्हेगारांच्या टोळ्यांना उच्चशिक्षित नागरिक मोठया संख्येने बळी पडत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. भरपूर पगार किंवा आर्थिक कमाई असतानाही या आधुनिक ठगसेनाच्या आकर्षक योजनांना व जादा कमाईच्या योजनाच्या मोहाला ते बळी पडत आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन फसवले जात असून अशा घटना नेहमी उघडकीस येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ही फसवणूक करणाऱ्या अतिहुशार आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सुद्धा तंत्रज्ञानाचा तितक्याच कुशलतेने वापर करीत आहे, हाच काय तो दिलासा आहे.
बुलढाणा येथील एका शिक्षकाची सायबर गुन्हेगारांनी वीस लाखाची ऑनलाइन फसवणूक केली होती.याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी अविरत परिश्रम घेत संशयित आरोपींना गुजरातच्या सुरत येथून अटक केली आहे. बुलढाणा सायबर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.फिर्यादी अशोक प्रकाश बुलकुडे (२९, रा. सुंदरखेड, बुलढाणा) यांना चालू वर्षाच्या जानेवारीमध्ये व्हाइट्सअपवर संदेश आला. त्यांना शेअर बाजारमध्ये जास्त नफा देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून जवळपास वीस लाख रुपये उकळण्यात आले.
हेही वाचा : Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करूनही त्याचा परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादी अशोक बुलकुडे यांनी बुलढाणा सायबर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी बुलढाणा सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले.त्यानुसार एएसआय शकील खान, पोलीस कर्मचारी राजदीप वानखेडे, विकी खरात, राजू आडवे, कुणाल चव्हाण, ऋषिकेश खंडेराव तसेच पंढरी सातपुते यांचे एक पथक स्थापन करण्यात आले. प्राप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात बुलढाणा सायबर पोलिसांना अखेर यश आले. या पथकाने गुन्हेगारचा मागोवा घेत गुजरात राज्यातील सुरत शहर गाठले. या कारवाईत आरोपी सय्यद नवाज सय्यद समद ( वय चौवीस वर्ष) अल्ताफ उर्फ फैजल खान अजीज खान (वय सत्तावीस वर्ष), शेख सुफीयान शेख इम्रान (वय तेवीस वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी गुजरात राज्यातील सुरत शहरातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.त्यांना अटक करून बुलढाणा येथे अनन्यात आले. आरोपींना बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती बुलढाणा सायबर पोलिसांनी दिली आहे.