लोकसत्ता टीम
बुलढाणा: बुलढाण्यात पार पडलेल्या मेळाव्यात खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला बचत गटांसाठी अनेक सुखद वार्ता दिल्या. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गटांसाठी सामुदायिक सुविधा केंद्र व ४ रेल्वेस्थानकात दुकाने मंजूर झाल्याची घोषणा त्यांनी केली. लवकरच गटांसाठी ‘मॉल’ उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
येथील सहकार विद्या मंदिरच्या सभागृहात बुलडाणा व मोताळा पंचायत समिती अंतर्गतच्या गटांसाठी विपणन मार्गदर्शन व बँक कर्ज वाटप मेळावा पार पडला. शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गटाद्वारे निर्मित खाद्य पदार्थ, शोभेच्या वस्तूचे यावेळी प्रदर्शन लावण्यात आले. यावेळी खासदार जाधव पुढे म्हणाले की, केंद्रीय ग्राम विकास समितीचा अध्यक्ष असताना अनेक राज्यातील महिला बचत गटांचा अभ्यास केला. महिला बँकेचे कर्ज वेळेवर भरतात व त्यांचे उत्पादनही दर्जेदार असते, असे आढळून आले. मात्र त्यांनी तयार केलेल्या मालासाठी विक्री व्यवस्था व विपणन प्रणाली नसल्यामुळे त्यांचे उद्योग बंद पडतात. त्यावर सामुदायिक सुविधा केंद्र हा तोडगा असून त्यावर ६० लाख खर्ची होणार आहे. मालास बाजारपेठ मिळावी यासाठी ‘ऍमेझॉन’ व ‘फ्लिपकार्ट’ च्या माध्यमातून विक्रीची सुविधा समूहांना उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’ भाग्यश्री विसपुते यांनी महिलांनी सामाजिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होण्याचे आवाहन केले. संचालन तालुका व्यवस्थापक सुषमा मुंगळे व आभार प्रदर्शन प्रेरिका तनुजा सय्यद यांनी केले.