लोकसत्ता टीम
अमरावती : विदर्भात अतिवृष्टी झाली असताना मदतीचे राज्य सरकारने दिलेले आश्वासन फसवे ठरले आहे. शासन आपल्या दारी हा ‘इव्हेंट’ साजरा करीत सरकार शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक करीत आहे. ‘इव्हेंट’वर खर्च करायला सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत, मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, हे केवळ दुर्लक्षच नाही तर फसवणूकच आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज येथे मोर्चाला संबोधित करताना केला.
शेतकरी आक्रोश मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापूस सोयाबीनसह संत्र्याचे भाव कोसळले आहेत. शेतकरी अडचणीत असताना विदर्भासाठी असलेले अधिवेशन फक्त बारा दिवसांचे ठेवले. त्यातही कामकाजाचे दिवस पाचच आहेत.सरकारला विदर्भातील प्रश्नांपेक्षा मुंबईला २५ डिसेंबर रोजी ट्रान्स हार्बरच्या उद्घाटनाची काळजी अधिक आहे.
आणखी वाचा-काँग्रेसची ईव्हीएमवर शंका, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “लोकांच्या मनातील संशय…”
एक रुपयात विमा देण्यामागे खासगी विमा कंपन्यांना लाभ पोहोचविण्याची खेळी आहे. या कंपन्यांना हजार कोटींचा प्रीमियम दिला गेला, शेतकऱ्यांनी ओरडू नये यासाठी एक रुपयाची खेळी केली. खत, बियाण्यांमध्ये भेसळ करणाऱ्या उत्पादक कंपन्या सोडून विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्याचा हा कायदा ग्रामीण भागातील विक्रेत्यांना उदध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर आम्ही अधिवेशनात आवाज उठवू व शेतकऱ्यांना दिलासा व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात नंतर जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.