बुलढाणा : सध्या महाराष्ट्रात मुघल शासक औरंगजेबाची कबर आणि त्यावरून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या नागपूर शहरात उसळलेल्या हिंसक दंगलीवरून राज्यातील सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता या संवेदनशील प्रकरणावरून समाजविरोधी व्यक्तींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा खोडसाळपणा केला जात आहे. याला विदर्भ पंढरी म्हणून प्रख्यात शेगाव नगरी सुद्धा अपवाद ठरली नाही! दंगलप्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करीत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना शेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
शेगांव पोलिसांनी सोहेल खान साहेब खान (२२, रा. अशपाक उल्ला चौक, शेगाव), नागेश श्रीकृष्ण कळसकार (२९, रा. व्यंकटेश नगर, शेगाव), मो. सलमान मो. लियाज (१९, रा. बाजार फैल), मो. उमर मो. शोएब (१८, रा. पुरुषोत्तम पाटील नगर, शेगाव), शुभम विठ्ठल ढगे (२९, रा. एसबीआय कॉलनी, शेगाव) यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार संजय करुटले यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६,१३५(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. पुढील तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संजय करुटले करीत आहेत.
…तर जेलमध्ये जाल
शेगाव पोलिसांनी नुसतीच कारवाई करून समाधान मानले नाहीये! ठाणेदार पाटील यांनी संत नगरी शेगावमधील मुख्य चौकात, संवेदनशील भागात यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू केले. ठाणेदार आणि त्यांचे सहकारी ध्वनीवर्धकवरून प्रबोधन करीत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर फॉरवर्ड किंवा अपलोड न करण्याचे आवाहन अभियानात करण्यात येत आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर किंवा दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट अपलोड किंवा फॉरवर्ड केल्यास आपणासही जेलची हवा खावी लागणार, अशी तंबी देण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सायबर विभागाची करडी नजर
ठाणेदार पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना महत्त्वापूर्ण माहिती दिली. पोलीस दलाचा सायबर विभाग, आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर नजर ठेऊन असून त्यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन कारवाई करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावत्ही पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यासाठी चौकाचौकात जाऊन पोलीस नागरिकांना पोलीस वाहनाद्वारे आवाहन करून माहिती देण्यात येत आहे आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे. सोशल मीडियामधून व्यक्त होत असताना कोणीही दोन समाजात द्वेष पसरेल, अशा पोस्ट, क्लिप्स किंवा मेसेज टाकू नयेत. तसे कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल. सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहनही पाटील यांनी केले.