लोकसत्ता टीम

वर्धा : महाविकास आघाडीतर्फे वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे शेखर प्रमोद शेंडे यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. शेखर शेंडे यांना उमेदवारी न देता डॉ. सचिन पावडे किंवा डॉ. उदय मेघे यांना संधी मिळणार, अशी शुक्रवारपर्यंत चर्चा होती. पण, रात्री प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेखर शेंडे यांना दिल्लीतून मुक्काम हलवा व कामाला लागा, अशी सूचना केली. आज शेंडे यांचे नाव जाहीर होताच त्यांच्या गोटात जल्लोष झाला. ते वर्ध्यातून चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत.

शेखर शेंडे यांचा तीनवेळा पराभव झाल्याने वर्धा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आग्रही होता. तसा पाठपुरावा झाला. शेवटी आज राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी शेंडे यांना उमेदवारी जाहीर होताच पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. ते म्हणाले, काँग्रेस आहे, काहीही होवू शकते. आम्ही सोमवारी समीर देशमुख यांचा अर्ज भरणार. पक्षश्रेष्ठींचा आम्हाला जागा मिळणार नसल्याचा निरोप नाही. आमचा गट तिकीट न मिळाल्याने संतप्त आहे. येथून काँग्रेस उमेदवार तीन वेळा पडल्याने ही जागा बदलून मिळणार व ती आम्हास मिळणार, असे सूचक संदेश होते. आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात पक्षातर्फे अर्ज सादर करण्याचा निर्णय झाला. अर्ज परत घ्या, असे पक्षनेते म्हटतील तर पुन्हा बैठक घेऊन अंतिम घेतला जाईल.

आणखी वाचा-निवडणूक चिन्हांची गंमत, अशीही व अशी ही चिन्हे…

समीर देशमुख म्हणाले, सर्वात एकनिष्ठ राहण्याचा आमचा इतिहास आहे. लोकसभा निवडणूकवेळी आमचा भ्रमनिरस झाला. पक्षात सक्षम उमेदवार असताना काँग्रेस नेत्याला आमच्या पक्षाची उमेदवारी दिली. आताही वर्धा जागा मित्रास दिली. असे असेल तर पक्ष टिकणार कसा. कार्यकर्ते म्हणतात की, ‘हेचि फळ काय मम् तपाला.’ आता मागे फिरणे नाहीच. अर्ज भरणार व तयारीला लागणार. पक्षाच्या नेत्यांचा अद्याप आम्हास काहीच निरोप नाही. म्हणून जागा बदलून ती काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादी लढणार, असा आम्हाला विश्वास आहे.

आणखी वाचा-प्रिया फुकेंविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर, नगरसेवक मुन्ना झाडे व अन्य नेत्यांनीही अशाच भावना व्यक्त केल्यात. काँग्रेसतर्फे अधिकृतपणे शेखर शेंडे यांचे नाव जाहीर झाले. तरीही राष्ट्रवादी शरद पवार गट असंतोष व्यक्त करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. खरंच या पक्षातर्फे शेंडेंविरोधात उमेदवारी येणार का, याकडे राजकीय वर्तुळचे लक्ष लागले आहे. शेंडे यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली तेव्हा प्रा. देशमुख हे बंडखोरी करीत अपक्ष निवडून आले होते.