वाशीम : लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून जिल्ह्यातील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावमध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे. शुक्रवारी शेगावातील या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर नेत्यांनी या स्थानांतरणास विरोध केला होता. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासन दरबारी मागास जिल्हा म्हणून वाशीम जिल्ह्याची नोंद आहे. सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. सिंचन वाढीसाठी विशेष निधी व प्रयत्नांची गरज असताना सरकारने जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय शेगाव येथे स्थानांतरित केल्याने जिल्हावासीयांमध्ये रोष आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन २००८ मध्ये वाशीम जिल्ह्यात पाटबंधारे मंडळ कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे सिंचन क्षमता वाढीस मदत झाली. परंतु महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने २३ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढून मंडळ कार्यालय स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. ही बाब मागास आणि आकांक्षित असलेल्या वाशीम जिल्ह्यासाठी अन्यायकारक असून खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार लखन मलिक, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार विजय जाधव यांनी त्यास विरोध दर्शवला. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

हेही वाचा – स्वतंत्र विदर्भासाठी जनजागृती मेळावे; भंडारा, मेहकर येथे आयोजन

हेही वाचा – प्रतियुती असल्याने गुरू येणार पृथ्वीच्या सर्वांत जवळ, कधी आणि कसे पाहता येणार? जाणून घ्या…

अखेर जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. २७ ऑक्टोंबर रोजी मंडळ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे सरकारविरोधात जिल्ह्यात तीव्र रोष व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shifting of irrigation board office to shegaon pbk 85 ssb