लोकसत्ता टीम

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रामटेक लोकसभेची जागा गमावल्यानंतर येथे विधानसभेतही दमछाक होण्याची चिन्हे आहेत. शिंदे यांनी रामटेक विधानसभेचा उमेदवारी जाहीर करताच भाजपने त्याच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

महायुतीमध्ये रामटेकची जागा शिवसेनेला (एकनाथ शिंदे) मिळाली आहे. शिवसेनेने येथे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. आशिष जयस्वाल मूळचे शिवसैनिक आहे. परंतु त्यांनी गेल्या निवडणुकीत बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडूक लढली. एकनाथ शिंदे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताच रामटेक भाजपचे पदाधिकारी बिथरले आहेत. २०१९ मध्ये युती धर्म न पाळणाऱ्या उमेदवारी देण्यास त्यांच्या तीव्र विरोध आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची आग्रह मागणी केली आहे. असे न झाल्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची आणि जयस्वाल यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे लोकसभेत रामटेक गमावणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) विधानसभेत भाजपकडून दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा-तुमच्या मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, बघा नामवंत शाळांचे शुल्क किती आहे?

रामटेक तालुक्यातील मनसर येथील भाजपच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात रामटेकची जागा भाजपने लढवावी, अशी भूमिका मांडण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पदाधिकाऱ्यांची भावना कळवण्याचा निर्णय घेतला . जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास रामटेक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे देतील. सर्व पदाधिकाऱ्यांनी रामटेक येथील शांती मंगल कार्यालयात त्यांचे राजीनामे घेऊन हजर राहण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली.

आमदार आशिष जयस्वाल यांनी रविवारी शिवसेनेेत (शिंदे) प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारशिवनी येथील सभेत त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करताच रामटेक भाजपमध्ये पडसाद उमटले. भाजपने पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले उपस्थित होते.

आणखी वाचा-नैऋत्य मोसमी पावसाची विदर्भातून पूर्णपणे माघार

भाजपकडून जयस्वाल यांना विरोध

भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी आणि भाजप रामटेकमधील पदाधिकाऱ्यांनी आशीष जयस्वाल यांच्या उमेदवारी विरोध केला आहे. जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे. सोबतच त्यांनी जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेतही होईल, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.