samruddhi mahamarg inauguration: दिवाळीच्या एक दिवस आधीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. नागपूर-मुंबई ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार असून यासंदर्भातील तारीखही जवळजवळ निश्चित करण्यात आल्याचं एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं आहे. येत्या २३ तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील या सर्वात मोठ्या महामार्गाचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र यासंदर्भातील वेळ आणि तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित झाल्यानंतरच सरकारकडून घोषणा केली जाणार आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : नागपूर ते गोवा केवळ ८-१० तासांत? ‘शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग’ कसा आहे?
मागील महिन्यामध्ये म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नियोजित लोकार्पण लांबणीवर पडले. राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यावेळेस लोकार्पण लांबणीवर पडल्याचं स्पष्ट केलं होतं. महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते शिर्डी पर्यन्तच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १५ ऑगस्टल होईल, असे जाहीर केले होते. मात्र नंतरच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला. मात्र काही कामे अपूर्ण असल्याने हा लोकार्पण सोहळा लांबवण्यात आल्याचं नंतर सांगण्यात आलं.
मात्र आता २३ तारखेला समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तारखेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्याचं ‘एबीपी माझा’ने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. वेळ आणि तारीख निश्चित झाल्यानंतर सरकारकडून यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भातील हलचाली सुरु झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
मुंबईला विदर्भाशी जोडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती.२०१५ ला या मार्गाचे काम सुरू झाले. जवळपास ७०१ किलोमीटरचा हा मार्ग असून तो १० जिल्ह्यातून जाणार आहे. २०१९ पर्यंतच तो पूर्ण होणार होता. यापूर्वी दोन वेळा तारीख जाहीर होऊनही ऐनवेळी लोकार्पण रद्द करण्यात आले होते.