आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातील अनेक मंत्री, आमदार नागपूरला रवाना झाले आहेत. शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलही अधिवेशनासाठी नागपूरला पोहोचले आहेत. पण अद्याप त्यांची राहण्याची काहीही सोय झाली नाही. ते आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह नागपूरला गेले आहेत. विधिमंडळात जाऊन सही केल्यानंतर आपण कुठे राहणार? हे ठरवणार असल्याचंही शहाजीबापू पाटलांनी सांगितलं.
राहण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “मी हिवाळी अधिवेशनासाठी अजून कुठे थांबलो नाही. बॅग अजूनही गाडीतच आहे. मी आता विधिमंडळात जाऊन सही करणार आहे. त्यानंतर हॉटेल किंवा आमदार निवासात राहण्याचा माझा विचार आहे. माझ्याबरोबर सोलापूरहून पाच-सहा पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी आले आहेत. त्यांची राहण्याची सोय कुठे करायची, हे मी बाहेर आल्यावर ठरवणार आहे,” अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटलांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा- “संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा”, भाजपा नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी
गुवाहाटीसारखं झाडी, डोंगर असलेलं हॉटेल तुम्ही शोधत आहात का? असं विचारलं असता पाटील म्हणाले, “मी नागपुरात कधीही कोणत्याही हॉटेलमध्ये राहिलो नाही. नागपुरात माझे अनेक मित्र आहेत. येथे किमान २०० घरं अशी आहेत, जिथे मी राहू शकतो. पण माझे एक-दोन आमदार मित्र कुठे राहत आहेत, त्यांच्याशी बोलून मी कुठे राहायचं ते ठरवणार आहे. झाडी आणि हॉटेल सगळीकडे आहेत. महाराष्ट्राला तर झाडांचं आणि डोंगराचं वैभव लाभलं आहे.”
हेही वाचा- “आपल्या चोर कंपनीला…”, घाबरू नका म्हणत संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
मला ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहायला जायचंय- शहाजीबापू पाटील
“या अधिवेशनात मला नागपूरची झाडी किती बघायला मिळतीय, हे मला सांगता येणार नाही. माझ्या जीवनाची ६६ वर्षे उलटली पण मी अजून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहिला नाही. मला एकदा ताडोबालाही जायचं आहे. विठ्ठलाच्या कृपेने जेव्हा योग जुळून येईल, तेव्हा मी ताडोबाला जाईल,” असंही शहाजीबापू पाटील म्हणाले.