वाशीम : राज्यातील सत्ता नाट्यानंतर वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी जिल्हयात दाखल झाल्या आहेत. भावना गवळी यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शहरातील वाटाने लॉन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शहरात सर्वत्र फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर भाजपच्या नेत्यांचेच छायाचित्र अधिक असल्यामुळे शिवसेना शिंदे गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्या २३ ऑगस्ट रोजी शहरातील वाटाने लॉन येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रवीण दरेकर, उद्घाटक म्हणून खासदार श्रीकांत शिंदे तर मार्गदर्शक म्हणून आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, आ. निलय नाईक, माजी आमदार विजय जाधव, माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया, भाजप यवतमाळचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने शहरभर लावण्यात आलेल्या फलकांवर या सर्वांचे छायाचित्र आहेत मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र नाहीत. यामुळे शिंदे गट भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

वर्षभरापूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभेप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी व खासदार भावना गवळी यांच्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. प्रकरण पोलिसातही गेले होते. दोन्ही गटांकडून आंदोलनेदेखील झाली होती. परंतु या मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे दोघांमधील वाद मिटला का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आरोप करणाऱ्यांना स्थान?

खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर गवळी यांच्या संस्थांवर ‘ईडी’ने कारवाईदेखील केली होती. त्यानंतर खा. गवळी यांच्या विरोधात भाजपने रान उठविले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आरोप करणारे एकाच मंचावर येणार असल्यामुळे  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Story img Loader