लोकसत्ता टीम
वाशीम : महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मंगरुळपीर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. परंतु या सभेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद लाभला नाही. गावागावात गाठीभेटीच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यत पोहचत असल्या तरी भाजपचा बालेकिल्ला असतांनाही शिवसेना शिंदे गटाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगरुळपीर व वाशीम शहरात बाईक रॅली काढणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची मतदार संघात चौथी भेट असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आणखी वाचा-लग्नाचे निमित्त झाले अन्… पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नी व मुलीला संपवले
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुध्द काँग्रेस अशीच थेट लढत यापुर्वी होत होती. परंतू राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर शिवसेना विरुध्द शिवसेना असा सामना येथे होताना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील महाले, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख, बसपाकडून हरिभाऊ राठोड, वंचित पुरस्कृत समनक पार्टीचे प्रा. राठोड यांच्यासह अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणत असले तरी खरी लढत ही राजश्री पाटील महाले व संजय देशमुख यांच्यातच होणार आहे. आज सायंकाळनंतर प्रचार तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसी प्रचाराची धामधूम राहणार आहे. वाशीम जिल्हयातील वाशीम मंगरुळपीर व कारंजा मानोरा या दोन विधानसभा मतदार संघावर भाजपची चांगली पकड आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या मदतीला भाजप , राष्ट्रवादी अजित पवार गट व मित्र पक्षाचे पाठबळ आहे.
प्रचाराकरीता कमी कालावधी मिळाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्यासमोर मतदारांपर्यत पोहचण्याचे मोठे आव्हान असतांना त्यांनी अल्पावधीतच मतदार संघ पिंजून काढला. प्रत्येक गावात पोहचण्यासाठी गाव भेटी, प्रचाररॅलीचा वापर हात असला तरी भाजपच्या गडातच त्यांची दमछाक होतांना दिसून येत आहे. मंगरुळपीर येथे नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिर सभा पार पडली. मात्र, या सभेला देखील अपेक्षित गर्दी नसल्याचे चित्र होते. मंगरुळपीर वाशीम हा भाजपचा बालेकिल्ला असतांनाही महायुतीच्या उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र तसे होतांना दिसून येत नसून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीम शहरात बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद साधणार आहेत. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवाराच्या प्रचारार्थ चौथ्यादा मतदार संघात येत असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लावताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा-मोदींना शेतकरी नेत्याचा सवाल; म्हणाले, “किती काळ अमेरिका दर…”
आयात उमेदवार महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार?
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार भावना गवळींना उमेदवारी देण्यावरुन भाजपच्या गोटातून कडाडून विरोध असल्यामुळे येथून नवीन चेहरा देण्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र एैनवेळी शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. यामुळे शिवसेना शिंदे गटालाच नव्हे तर सर्वांनाच धक्का बसला. महायुतीतील अनेक ईच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असतांना बाहेरील उमदेवार दिल्याने जिल्हयात लायक उमेदवार नव्हता का? अशी चर्चा रंगत असून आयात उमेदवार महायुतीसाठी कितपत फायद्याचा ठरणार. हे लवकरच स्पष्ट होईल.