अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार राहील, हे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्‍पष्‍ट केले असले, तरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी दावा सोडलेला नसल्‍याने महायुतीत उमेदवारीचे त्रांगडे कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी भाजपची उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून प्रचाराला सुरूवात केली आहे. सध्‍या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मेळघाटमध्‍ये प्रचारात व्‍यस्‍त आहेत. दरवर्षीप्रमाणे राणा दाम्‍पत्‍य मेळघाटातील आदिवासींसमवेत होळीचा सण साजरा करणार आहेत.

हेही वाचा…गडचिरोली : लोकसभेसाठी काँग्रेसचा नव्या चेहऱ्यावर डाव, महायुतीही त्याच वाटेवर? विलंबाने चर्चांना उधाण

दुसरीकडे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अभिजीत अडसूळ यांनी राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. राणा विरोधकांची एकत्र मोट बांधण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे. अमरावतीची जागा ही शिवसेनेची आहे, आमचा अमरावतीवरील दावा कायम आहे, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. भाजपमधील एक गट राणांच्‍या विरोधात आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हेही राणा यांच्‍या विरोधात दंड थोपटून आहेत, अशा स्थितीत नवनीत राणा यांच्‍यासाठी उमेदवारीची वाट बिकट बनली आहे.

नवनीत राणा यांच्‍या कथित बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने राखून ठेवला आहे. तो केव्‍हाही जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. राणा यांच्‍यावर ही देखील एक टांगती तलवार आहे, त्‍यामुळे नवनीत राणा यांच्‍या भाजप प्रवेशाविषयी भाजपचे वरिष्‍ठ नेते तूर्तास काही बोलण्‍यास तयार नाहीत. अमरावतीची जागा भाजप कमळ या चिन्हावरच लढणार, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना पुन्‍हा सांगितले. पण उमेदवार कोण, याबद्दल अजूनही काही स्पष्टता नाही. नवनीत राणा की आणखी कुणी, या प्रश्‍नावर त्यांनी अतिशय सावध उत्तर दिले. भाजपमध्ये कोण प्रवेश करणार किंवा नाही, हे सध्यातरी निश्‍चित नाही. पण येथे सर्वांची मदत घेऊ. प्रतिष्ठेप्रमाणे सर्वांना तिकीट दिले जातील. सर्वांचा सन्मान ठेवण्यात येईल. राजकारण करताना काही मतभेद होत असतात. बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झालेही असतील. मात्र, देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे, यासाठी बच्चू कडू, अडसूळ यांच्यासह सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू आमच्यासोबत राहतील, असा दावा त्‍यांनी केला आहे.

हेही वाचा…बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण

अमरावतीत रवी राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्‍यातील संघर्ष नवा नसला, तरी महायुतीतील घटक असलेल्‍या या दोन नेत्‍यांमधील विसंवाद निवडणुकीच्‍या तोंडावर चव्‍हाट्यावर आला आहे. महायुतीच्‍या नेत्‍यांना एका मंचावर आणू आणि नवनीत राणा यांच्‍या प्रचारासाठी भाग पाडू, असे वक्‍तव्‍य रवी राणा यांनी केले होते. त्‍याचे तीव्र पडसाद उमटले. त्‍यावर आमदार बच्‍चू कडू आणि अभिजीत अडसूळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्‍यानंतर रवी राणा यांनी व्‍यक्‍त होण्‍याचे टाळले. आता अमरावतीत महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची उत्‍सुकता ताणली गेली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde shiv sena leader anandrao adsul claims on amravati lok sabha candidacy despite bjp s clarification mma 73 psg