भंडारा :’शिवभोजन थाळी’ योजना सरकारी ॲपमध्येच गटांगळ्या खात आहे. ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असून वारंवार लाभार्थ्यांची नोंदणी वेळेवर होत नाही. तुमसर शहरात गेल्या तीन- चार दिवसांपासून ‘शिवभोजन ॲप’ मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी, हे शिवभोजन थाळी केंद्रचालक त्रस्त झाले. शिवाय वेळेची मर्यादा या योजनेला घातली असल्याने अनेक गरजू दहा रुपयांच्या जेवणापासून वंचित राहात आहेत.

काय आहे शिवभोजन ‘ॲप’चा घोळ ?

शहरात १२ शिवभोजन थाळी केंद्रे कार्यरत आहेत. शासनाकडून केंद्रांना थाळीमागे अनुदान मिळते. ‘शिवभोजन’ नावाचे अँप केंद्रचालकांना दिले आहे. या केंद्रात कुणी जेवण घ्यायला गेले की त्या व्यक्तीचा पहिल्यांदा त्याचा फोटो काढला जातो. तो ॲपमध्ये सबमिट करावा लागतो. त्यानंतर त्या ॲपमधून त्या व्यक्तीचा थाळीचे कुपन येते. त्यानंतरच त्या लाभार्थ्याला भोजन मिळते. केंद्रचालकांकडे असलेल्या ॲपमध्ये त्याला तो लॉगीन करुन लाभार्थ्याच्या नावासह अपलोड करावा लागतो. तोपर्यंत त्याला जेवण मिळत नाही. पण या सगळ्या प्रकारात खूप वेळ जातो.

शिवभोजन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्यावर जेवणाऱ्याचे रजिस्ट्रेशन वेळेवर होत नाही. शिवाय या योजनेची वेळ मर्यादित असल्यामुळे हे सरकारी ॲप आपोआप बंद होते. त्यामुळे एखादा कुणी जेवायला आला तर जेवण असूनही या योजनेत त्याला भोजन देता येत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहताहेत. शिवाय एखाद्या केंद्रचालकांची पन्नास थाळी संपली असतील आणि त्याच्या मंजूर जेवणांची संख्या शंभर असेल तर; ॲप बंद होत असल्यामुळे त्याची उरलेली पन्नास थाळी जेवणेही वाया जात आहेत. याकडे जिल्हा पुरवठा विभागाच्या तांत्रिक सहाय्यकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून सहकार्य मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

“स्वस्त दरात भोजन मिळत असल्याने शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद आहे. पण अधूनमधून तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक जण न जेवताच जात आहेत.” रोशनकुमार निखाडे, शिवभोजन केंद्र चालक तुमसर