यवतमाळ : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर यवतमाळमधील शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने शहरातील दत्त चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान ‘ईडी’ आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत ही कारवाई मागे घेण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासदार राऊत हे शिवसेनेचा बुलंद आवाज आहे त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून ही कारवाई सुडबुद्धीने केली जात आहे. राऊत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडतात म्हणून त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केला. भाजप ही ‘वॉशिंग मशीन’ झाली असून ती अनेकांना पवित्र करण्याचे काम करत असल्याची टीका राजेंद्र गायकवाड यांनी केली. आंदोलनात उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Story img Loader