नागपूर : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन आणि सतत वादग्रस्त विनोदशैलीमुळे चर्चेत असलेला कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले. त्यानंतर शिंदे समर्थकांनी हा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला तिथेच जाऊन तोडफोड केली. या वादग्रस्त वक्तव्यावर नागपुरातील राजे मुधोजी भोसले यांनीही भाष्य केले आहे. त्यांनी कुणाल कामराने शिंदे गटातील शिवसेना नेत्यांवर टिका केल्यास ते आक्रमक होतात. परंतु शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कोरटकर, सोलापूरकरबाबतीत तुमची आक्रमकता कुठे जाते? हा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन आणि सतत वादग्रस्त विनोदशैलीमुळे चर्चेत असलेला कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय टीका टीप्पणी करताना त्याने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले. परिणामी एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी त्याचा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला तिथेच जाऊन तोडफोड केली. दरम्यान, या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या ११ जणांना अटक करण्यात आली आहे. हा मुद्दा विधीमंडळ सभागृहातही आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरा यांना माफी मागण्यास सांगितले. सोबत कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला.
दरम्यान या वादग्रस्त मुद्यावर नागपुरातील राजे मुधोजी भोसले यांनीही फेसबुक पेजवर पोस्ट लिहून उडी घेतली आहे. राजे मुधोजी भोसले यांनी पोस्टमध्ये म्हटले की, कुणाल कामरा याने जे गितरुपी वक्तव्य केले त्याचा मी निषेध करतो. समर्थन करीत नाही. परंतु माझा एकनाथ शिंदे गटातील शिवसेना नेते, आमदार, खासदार व मंत्री महोदयांना प्रश्न आहे. तुमच्या नेत्यावर टिका झाल्यास आपण आक्रमक होता. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर आपण पक्ष चालवता. त्याच दैवतावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमान कारक वक्तव्य करणाऱ्या कोरटकर, सोलापूरकर बाबतीच तुमची आक्रमकता कुठे जाते?, असेही भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. आता त्यावर शिवसेना शिंदे गटाकडून काही प्रतिक्रिया येते काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरटकर, सोलापूरकरांचे वादग्रस्त वक्तव्य काय?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोनद्वारे करून धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी कोरटकर याने ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची धमकी दिली. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही झाली आहे. तर राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते.